Breaking News

व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटाला अटक

मुरूडमध्ये पाच कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

मुरूड, अलिबाग ः प्रतिनिधी
परफ्यूम बनविण्यासाठी वापरली जाणारी व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असणार्‍या तीन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुरूड तालुक्यातील काशीद येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो ग्रॅम वजनाची उलटी आणि दोन मोटरसायकल असा पाच कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुरूड तालुक्यातील काशीद येथे व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विकण्याकरिता काही इसम येणार असल्याची माहिती एलसीबीमधील पोलीस नाईक अक्षय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने काशीद येथे सापळा रचला.
या वेळी व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दर्पण रमेश गुंड (वय 34, रा. मजगाव), नंदकुमार खंडू थोरवे, (वय 41, रा. नांदगाव) आणि राजेंद्र जनार्दन ठाकूर (वय 50, रा. मजगाव) यांना एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच कोटी रुपये किमतीची पाच किलोग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आणि 90 हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल असा एकूण पाच कोटी 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply