Breaking News

पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सरसावले

दीड टन अश्वखाद्य माथेरानमध्ये दाखल

कर्जत : बातमीदार

लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांवरही रोजच्या खाण्याचे संकट ओढावले आहे. पर्यटन व्यवसाय थांबल्याने माथेरानमधील घोड्यांचा खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के व त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

माथेरान या पर्यटनस्थळी सुमारे 450 घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. लॉकडाऊनमुळे येथील पर्यटन व्यवसाय बंद असल्याने घोड्यांना चारा देण्यासाठी अश्वपालकांच्याकडे पैसे नाहीत. अश्वखाद्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, जिल्हास्तरीय प्राणी क्लेश समिती सदस्य, प्राणीमित्र आणि प्राणी कल्याणाकरिता सतत झटणार्‍या व्यक्ती यांची मदत घेण्यात येत आहे. सीमा शांतीलाल पुनमिया यांनी पंख फाऊंडेशनच्या वतीने मुक्या प्राण्यांची भूक शमवण्यासाठी फूड बँकची स्थापना केली आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून या घोड्यांसाठी हायडॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुरुवारी (दि. 6) प्राथमिक स्वरुपात एक हजार 500 किलो गोदरेज ग्रोवेट कंपनीचे पौष्टिक अश्वखाद्य माथेरानमध्ये पाठवले आहे. या वेळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत,  अश्वपाल संघटनेच्या नेत्या आशा कदम यांच्यासह अश्वपालक धान्य गोदामात उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागातर्फे पुढील दोन ते तीन दिवसात दोन हजार किलो अश्वखाद्य पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, पशूपालकांनी शक्यतो आपली जनावरे मोकाट सोडू नये, असे जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून पशूपालकांना सूचित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पशूसंवर्धन विभागाकडून मुक्या प्राण्यांवरील उपचार व लसीकरणाची काळजी घेण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील भटके कुत्रे, गाई, बैल व वासरे इत्यादी प्राण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चारापाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याकरिता तालुकास्तरावर पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, पंचायत समिती स्तरावर पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply