सभापतीपदांवरही भाजपचे वर्चस्व
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या उपमहापौर, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि प्रभाग समिती पदांची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. 11) झाली असून अपेक्षेप्रमाणे सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये उपमहापौरपदी खांदा कॉलनीतील कर्तव्यदक्ष नगरसेविका सीताताई पाटील विराजमान झाल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेसाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये पिठासीन अधिकारी (जिल्हाधिकारी) डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविषयक नियमांचे पालन करून विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सचिव आदी उपस्थित होते.
या निवडणुकीत उपमहापौरपदी सीताताई पाटील, स्थायी समितीच्या सभापतीपदी अॅड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापतीपदी हर्षदा उपाध्याय, तर प्रभाग समिती ‘अ’च्या सभापतीपदी संजना कदम, ‘ब’च्या सभापतीपदी प्रमिला पाटील, ‘क’च्या सभापतीपदी अरुणा भगत आणि ‘ड’च्या सभापतीपदी अॅड. वृषाली वाघमारे यांची निवड झाली.
नवनिर्वाचित उपमहापौर व सभापतींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, किर्ती नवघरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.