खारघर : रामप्रहर वृत्त
कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यांचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अॅल्युमिन मीटतर्फे माजी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले.
प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी सरस्वती पुजन केले व कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मराठी भाषा गौरव वर पोवाडा सादर केला. त्यातुन त्यांनी आपले मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले तसेच म्हाविद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील अभ्यासिकेत मराठी पुस्तकांचा संग्रह विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला तसेच 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2022 हा मराठी भाषा संवर्धन सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिवस अर्थात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेज विभागाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक राजेंद्र चौधरी यांनी या वेळी मराठी भाषेच्या अलौकिक सामर्थ्य आणि क्षमतेचा गौरव करून मराठीसारखी एक समृद्ध भाषा आपली मातृभाषा असल्याचा अभिमान व्यक्त केला. यासोबतच प्रा. चौधरी यांनी मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे दाखले देऊन अगदी रामायण महाभारतामध्येही या भाषेचा उल्लेख असल्याचे सांगून ही अभिजात भाषा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. महान पराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची भाषा मराठी होती याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या प्रमुख भाषणात प्रा. राजेंद्र चौधरी यांनी ज्यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो त्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक जीवनाचा धावता वेधक आढावा घेतला. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.