पाली : प्रतिनिधी
पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड तालुक्यातील पाली गावाला पाणीपुरवठा करणारी अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कधी कारखान्याचे दूषित पाणी, तर कधी घाण व केरकचरा यामुळे नदी प्रदूषित होतेय, अशातच आता काही मच्छी व चिकन व्यावसायिक न विकली गेलेली सडलेली मासळी व मेलेल्या कोंबड्या रात्रीच्या वेळी नदीत फेकून देतात. नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. परिणामी या मेलेल्या कोंबड्या व मासळी नदीपात्रात तिथेच पडून राहते व सडते. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पालीकरांना पुरविले जाते. परिणामी रोगराई पसरण्याचा धोकादेखील आहे.
नगरपंचायतीच्या माध्यमातून या दुकानदारांना नोटीस पाठविण्यात येईल. कोणीही अशा प्रकारे नदीचे पाणी दूषित करू नये.
-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली, सुधागड