खालापूर : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच विविध प्रभागातील गणेश विर्सजन घाटाची दुरुस्ती व संरक्षण कठडे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे आणि खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या कामांची नुकतीच पाहणी केली. या वेळी उपमुख्याधिकारी गौतम भगळ व नगर परिषदेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
खोपोली शहरात एकूण 86 किमी लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत. नगर परिषदेने या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले असून खडी, ग्रीटचा वापर करून खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.
पाताळगंगा नदीवरील गगनगिरी आश्रम, रहाटवडे सिध्दार्थनगर, मुळगांव, शिळफाटा, ताकई येथील विर्सजन घाटावरील गवत, झुडपे तोडून परिसर स्वच्छ करण्यात आला असून नदीपात्रालगत तात्पुरते बांबूचे संरक्षण कठडे, विजेची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी शहरातील मोगलवाडी, हनुमान मंदिर (शिळफाटा), शंकर मंदिर तलाव (वरची खोपोली) या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper