म्हसळा : प्रतिनिधी
शहरातील नागरी वस्तीत शासकीय धान्य गोडाऊन असून ते अन्यत्र हलवावे किंवा गोदामाला अन्य मार्गाने रस्ता द्यावा, अशी मागणी म्हसळ्याच्या पहिल्या नगराध्यक्षांनी केली होती, मात्र ही मागणी महसूल विभागाने अजूनही अनुत्तरित ठेवली आहे. म्हसळ्यातील कन्याशाळा परिसरांत 50 ते 52 वर्षापूर्वी अन्न नागरी पुरवठा विभागाने शासकीय गोडाऊन उभारले आहे. तालुक्यातील नागरिकांना शासनाकडून येणारे धान्य साठा करणे व वितरण करणे यासाठी हे गोडाऊन बांधले आहे. तत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारा गोदामाचा जोडरस्तासुद्धा करण्यात आला आहे. नागरी वस्तीतून जाणार्या या रस्त्यावर आता नगरपंचायत प्रशासनाने सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत. एकतानगर, लवासा, मातोश्री पार्क, विद्यानगरी, रोहिदासनगर, वाळवटकर कॉम्प्लेक्स, शंकर मंदिर या परिसरातील नागरिकांच्या रहदारीच्या या रस्त्यावरून शासकीय गोदामाचे धान्य घेऊन येणार्या गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्यासाठी खर्च केलेला निधी पाण्यात जाणार आहे. शाळा, अंगणवाडी आणि ग्रामदेवता धावीर मंदिर, राधाकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, शंकर मंदिर, अक्कलकोट स्वामी मंदिर अशी सहा मंदिरे याच मार्गावर आहेत. पुरवठा विभागाच्या शिधापत्रिका धारकांना असणार्या विविध योजना अंर्तगत तालुक्यात मासिक 500 ते 600 मे.टन (तांदूळ, गहू, साखर, डाळी, खाद्यतेल) येत असते. ते धान्य तालुक्यातील 82 गावांमधील 40 ते 45 रास्त भाव धान्य दुकानांमार्फत वितरण करण्यात येते. त्यामुळेच या मार्गावर सतत क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक होत असते. अवजड वाहनांचा त्रास साने आळी व अन्य घरांना होत असतो.
शासकीय गोदामाचा या परिसरांतील जनतेला त्रास होत असल्याने आम्ही गोडाऊन या भागातून अन्यत्र हलवावे, अशी मागणी केली आहे, शासनाने त्या जागी तहसील कार्यालय किंवा अन्य शासकीय कार्यालय बांधावे.
-मंगेश म्हशीलकर, रहिवासी, म्हसळा
गोडाऊन या भागातून अन्यत्र हलविणेबाबत शासनाचे धोरण प्रस्तावित आहे.
-समीर घारे, तहसीलदार, म्हसळा