नागोठणे : प्रतिनिधी : विभागातील पळस या गावाला विद्युत पुरवठा करणारा रोहित्र अर्थात ट्रान्स्फॉर्मर गावासमोरील महामार्गाच्या पलिकडे असून सध्या बाजूच्या भरावामुळे हा ट्रान्स्फॉर्मर खोल खड्ड्यात गेला आहे. पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विद्युत वितरणच्या कर्मचार्याला येथे जाणे त्रासदायक होत आहे. महामार्ग खाते, संबंधित ठेकेदार आणि विद्युत मंडळाने समन्वय साधून हा ट्रान्सफॉर्मर गावाच्या बाजूला उभारावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात भराव झाल्याने पळस गावाचा ट्रान्स्फॉर्मर खड्ड्यात गेला आहे. पावसाळ्यात हा खड्डा पाण्याने भरून जात असल्याने महावितरणच्या कर्मचार्याला या ठिकाणी जाणे त्रासदायक ठरत असते. रात्री वीज गेल्यास फ्यूज टाकणेसुद्धा शक्य होत नसल्याने सर्व गावाला रात्रभर अंधारात बसावे लागते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पूर्वीचा जुना महामार्ग पूर्व बाजूला आहे व त्याच्या बाजूला जागा सोडून पश्चिम बाजूला दुसरा रस्ता बांधण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्याच्यामधून नवीन महामार्ग उभारण्यात येत असून हा महामार्ग भराव टाकून 20 फूट उंचीवर उभारला जात आहे. गावाचे प्रवेशद्वारासमोर जुन्या महामार्गाजवळ ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी लोखंडी खांब उभारले आहेत. महामार्गापलीकडील ट्रान्स्फॉर्मर उचलून तो गावाच्या समोर बसविणे एवढेच काम बाकी असल्याने महामार्ग विभागाने विद्युत वितरणच्या सहकार्याने तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात.
पळस गावाच्या ट्रान्स्फॉर्मर जागा महामार्गाच्या अंतर्गत असून त्या खात्याने हा ट्रान्स्फॉर्मर हलविण्याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधून पुढाकार घेतल्यास ही ट्रान्स्फॉर्मरची जागा बदलण्याची मागणी मार्गी लागू शकेल.
-गायकवाड, कनिष्ठ अभियंता, महावितरण, नागोठणे विभाग