पनवेल : रामप्रहर वृत्त
बँक ठेवीदारांसाठी विम्याच्या संरक्षणाची रक्कम एक लाखांवरून थेट पाच लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना आता झाला आहे. जर बँक बुडाली तर बँकांमध्ये ठेवी ठेवणार्या सामान्य नागरिकाला आधार मिळावा म्हणून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील सामान्य ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यानंतर मे 2019पासून बँकेतील सामान्य ठेवीदारांना कर्नाळा बँकेकडून पैसेच मिळत नव्हते. कर्नाळा बँकेचे ठेवीदार हतबल आणि हताश झाले होते. आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती स्थापन झाली आणि त्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना या बाबत मदतीसाठी पाचारण केले. सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली मागणी, मोर्चे, आंदोलन, पाठपुरावा करण्यात आला तसेच वर्षानुवर्षे अनेक बँकातील ठेवीदारांना त्यांचे पैसेच परत मिळाले नव्हते. त्यामुळे सोमय्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ही परिस्थिती मांडली आणि मार्ग काढण्याचा आग्रह धरला. सोमय्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला तसेच कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात राज्यातील पोलिसांकडून कोणालाही अटक होत नव्हती. सोमय्यांच्या पाठपुराव्यामुळे ‘ईडी’ने विवेक पाटलांना अटक केली. गेले आठ महिने विवेक पाटील तळोजा जेलमध्ये जामिनाच्या प्रतिक्षेत आहेत. कर्नाळा बँकेवरही अवसायक नेमण्याची कारवाई होत नव्हती. त्याबाबतही सोमय्यांनी कर्नाळा बँक अवसायानात काढण्याचा रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा केला. त्यामुळे कर्नाळा बँक अवसायानात निघाली. त्यापूर्वीच पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून विम्याच्या संरक्षणाची रक्कम वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होतेच.
घोटाळेबाज विवेक पाटलासाठी ‘दिबां’नाही लावले पणाला
एका बाजूला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर हे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सहकार्याने कर्नाळा बँक ठेवीदारांना न्याय देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करीत असताना शेकाप नेते मात्र ठेवीदारांना दिलासा देण्याऐवजी विवेक पाटील यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीशी तडजोड केली. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाकडे पाठ फिरवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला शेकाप आमदार बाळाराम पाटील यांनी बिनदिक्कतपणे पाठिंबा दिला. त्यांचे बगलबच्चेही विवेक पाटील यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘हो ला हो’ मिळवत होते, मात्र एवढी अजीजी करूनही विवेक पाटील यांना 15 जून 2021 रोजी ‘ईडी’ने अटक केलीच.
बँक ठणठणीत, मग पैसे कुठे आहेत?
कर्नाळ बँकेत घोटाळा झाला असताना त्या काळात तर ‘कर्नाळा बँक ठणठणीत, विवेक पाटील यांची प्रकृती उत्तम’, अशा आशयाचे वृत्त स्वयंघोषित समाजसेवकाने प्रसिद्ध केले होते. मग कर्नाळा बँक ठणठणीत होती तर मग ठेवीदारांना कर्नाळा बँकेने आतापर्यंत त्यांचे लाखो रूपये परत का केले नाहीत, याचे उत्तर स्वयंघोषित समाजसेवकाने द्यावे आणि मग न केलेल्या कामाचे फक्त श्रेय घेण्यासाठी आटापिटा करावा. कर्नाळा बँक ठणठणीत, विवेक पाटील यांची प्रकृती उत्तम’ असे प्रसिद्ध करून ठेवीदारांची दिशाभूल करण्याचा आणि कर्नाळा बँक घोटाळा व विवेक पाटलांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या स्वयंघोषित समाजसेवकाने केला होता हेच आता सिध्द होत आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळेच ठेवीदारांना दिलासा
कर्नाळा नागरी सहकारी बँक 13 ऑगस्ट 2021 रोजी अवसायनात गेल्यानंतर माझी दीड महिन्यानंतर अवसायक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर प्रथम क्लेम सादर करण्याचे आम्ही उद्दिष्ट ठेवले आणि सर्व लोकांची जी काही कागदपत्रे आली होती त्याच्या आधारे क्लेम लिस्ट तयार करून डीआयसीजीसी कार्यालयाकडे पाठवली. येथे जे ऑडिट व्हायचे बाकी होते ते पूर्ण केले. त्यामुळे यादी सादर करायला थोडासा उशीर झाला. ते ऑडिट पूर्ण झाल्यानंतर क्लेम यादी डीआयसीजीसीकडे पाठवली आणि लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर डीआयसीजीसीने ऑडिटर पाठविला आणि ऑडिट प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर डीआयसीजीसीकडून आम्हाला 9 तारखेला संदेश आला की, 386 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवला होता त्यापैकी 374 कोटी क्लेम मंजूर झाला आहे. जवळपास 38 हजार 700 ठेवीदार खातेदारांना डीआयसीजीसीच्या निर्णयामुळे फायदा होणार आहे. बँकेच्या ठेवींवर विमा हप्ता भरला जातो. पूर्वी एक लाखापर्यंत विमा संरक्षण होते, पण केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तो पाच लाख रुपये करण्यात आला आहे आणि या निर्णयातून ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 99 टक्के लोक आणि 75 टक्के ठेवी सुरक्षित झाली आहे. ज्याचे 50 हजार आहेत त्यांना 50 हजार मिळणार आहेत ज्याचे पाच लाखांवर आहेत त्यांना पाच लाख रुपये मिळणार आहेत. ज्या ठेवीदारांनी केवायसी कागदपत्रे व अन्य बँक खाते तपशील दिलेला आहे तसेच ज्यांना विमा संरक्षण ठेव अंतर्गत रक्कम मंजूर झालेली आहे, त्यांना बँकेत येण्याचा दिनांक व वेळ दूरध्वनीद्वारे कळविण्यात येत आहे. आज पायलट बसेस वर 200 जणांना या संदर्भात बोलवले होते. डीआयसीजीसीच्या निर्देशानुसार चार महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, मात्र आम्ही लवकरात लवकर प्रकिया पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहोत.
– बी. के. हांडे, अवसायक, कर्नाळा नागरी सहकारी बँक लि.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार. पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना न्याय मिळाला. आता पाच लाखांहून अधिक ठेवी असणार्या ठेवीदारांसाठी आमची समिती लढेल. यांचे पैसेही मेहनतीचे आहेत. पाच लाखांहून अधिक ठेव ठेवणार्यांमध्ये अनेक नागरिक, ग्रामपंचायती, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या यांच्यासाठी आता कर्नाळा बँकेशी संघर्ष करावा लागणार आहे. तो आम्ही निश्चितच करू.
-आमदार प्रशांत ठाकूर
कार्याध्यक्ष, कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती