अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेवर अन्याय करत आहेत. आमच्या कामाचे श्रेय घेत आहेत. हा अन्याय आता सहन करणार नाही. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर गप्प बसणार नाही. अंगावर याल तर सोडणार नाही. आमच्या नादी लागला तर जिल्ह्यात जी हालत शेकापची झाली आहे तशी तुमची करू. जिल्ह्यातून हद्दपार करू, असा इशारा रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेची आढावा बैठक आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बदलून शिवसेनेचा कुठलाही मंत्री पालकमंत्री म्हणून द्या, अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली. या बैठकीला आमदार महेंंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार मनोहर भोईर, तुकाराम सुर्वे, दक्षिण-रायगड प्रमुख अनिल नवगणे, शिरीष घरत, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आदी पदाधिकारी व नेते उपस्थित होते. आम्ही केलेल्या कामाचे श्रेयदेखील पालकमंत्री घेतात. आम्ही गप्प बसरणार नही. लवकरच आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बदला, अशी मागणी करणार आहोत. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही, असे आमदार भरत गोगावले म्हणाले. महेंद्र दळवी यांनी सुरुवातीलाच आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आवाज उठवला. रायगडात शेकापचा आता एकही आमदार नाही. तुमचा एकच आहे. त्यामुळे सावध रहा, सुधारा अन्यथा जिल्ह्यातून हद्दपार करू, असा इशारा आमदार दळवी यांनी राष्ट्रवादीला दिला.
पालकमंत्री हटाव मागणीचा पुनरूच्चार
पालकमंत्री हटविल्याशिवाय गप्प बसणार नाही, श्रीवर्धनचा आमदारदेखील आम्ही बदलू असे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. माजी आमदार मनोहर भोईर, दक्षिण-रायगड प्रमुख अनिल नवगणे, शिरीष घरत यांनीदेखील आपल्या भाषणात आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पालकमंत्री हटावच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper