पनवेल : नितिन देशमुख
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकेले आहेत. भारत सरकार या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अजुनही युद्धाच्या ठिणग्या सोसत आहेत, तर काही सुखरुपपणे परतले आहेत. असाच युक्रेन ते भारत या प्रवासातील थरारक अनुभव पनवेल तालुक्यातील करंजाडेत राहणारी प्रचिती पवार हीने सांगितला आहे.
पहाटे मोठी बहिण आदितीचा फोन होता. बातम्या बघ युध्द सुरू झाले आहे. मग मी माझ्या खारगिव्हला राहणार्या मैत्रिणीला फोन केला तेव्हा तिने माझ्यासमोर खूप बॉम्ब पडत आहेत मुले सगळीकडे धावत असल्याचे सांगितले. लगेच मम्मीचा फोन आला तुम्ही कसे ही करून निघा. तेव्हाच कळले मला युद्ध सुरू झाल्याचे तोपर्यंत माहीतच नव्हते. मी घरी आले आता माझे मित्र पण लवकर घरी यावेत. त्यांना आपल्या सरकारने लवकरात लवकर बाहेर काढावे युक्रेनमधील इव्हानो फ्रांसक्वीसमध्ये मेडिकलच्या दुसर्या वर्षाला शिकणारी पनवेलच्या करंजाडे येथील प्रचिती दीपक पवार सांगत होती.
युक्रेनमध्ये मी पश्चिम बाजूला असल्याने आम्हाला वाटलेले युध्द झाले तरी आमच्याकडे फारसे काही होणार नाही. 24 तारखेला आम्हाला समजले की खारकीव्ह आणि त्यांची राजधानी किव्हमध्ये युध्द सुरू झाले असून आमच्या इथले विमानतळही उडवण्यात आले आहे. 25 तारखेला आम्हाला तेथून निघावे लागेल, असे सांगण्यात आले पण काही झाले नाही. मेयरने आम्हाला सगळे लाईट बंद करा बाहेर पडू नका सांगितले होते. प्रत्येक कॉलनीच्या बाहेर रुग्णवाहिका उभी होती. कारण कोठेही बॉम्ब पडण्याची शक्यता होती. आता घरी कसे जाणार, कधी जाता येईल असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण प्रथम हॉस्टेलमधील मुलांना नेले जाईल मग आमचा नंबर कधी लागेल असा प्रश्न पडला होता.
तिथे आपल्या देशातील 20 हजार मुले आहेत. त्यातच विमानाच्या तिकिटाचे दर खूप वाढले होते. कमीत कमी दर एक लाख 15 हजार होता. तो सर्वांना परवडणारा नव्हता. बहुतेकांची तिकिटे 1 मार्च पासूनची होती माझे 2 मार्चचे होते, पण त्यापूर्वीच युध्द सुरू झाले.
आम्ही विद्यार्थ्यांचा 25 तारखेला ग्रुप बनवून बस केली. रुमानियाला आम्ही 50 मुले रात्री निघालो ते खूप रिस्की होते कारण तिथून रात्री फ्लाईट नव्हते कधी ही कोणी आम्हाला थांबवू शकत होते, पण असे काही घडले नाही. बसवर आम्हाला सांगण्यात आले होते भारताचा ध्वज लावा त्याप्रमाणे आम्ही लावला होता. त्यामुळे कोणती अडचण आली नाही. चेक पोस्टवर सोडून देण्यात येत होते. काही विचारत नव्हते. बॉर्डरपासून 5-6 किमी अंतरावर आम्हाला बस थांबवावी लागली, कारण पुढे मोठी रांग होती. त्यानंतर आम्हाला चालत प्रवास करावा लागला जवळजवळ 15-20 किमी प्रवास चालत केला. रुमानियाच्या बॉर्डरवर गेलो. तिथे आधीच खूप मुले आली होती, गर्दी होती, 15-20 मिनिटे गेटच्या बाहेर थांबल्यावर आम्हाला जायला दिले. इमिग्रेशनसाठी 8 ते 9 तास आम्ही रांगेत उभे होतो. रुमानियाच्या सरकारने, एनजीओ आणि आपल्या वकिलातीने आम्हाला विमानतळापर्यंत पोहचायला खूप मदत केली. रुमानियाच्या बॉर्डरवर युक्रेनची लोक आणि परदेशी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमले होते. युक्रेनची लोक आम्हाला पुढे जाऊन देत नव्हती त्यांना मारून ढकलून पुढे जावे लागत होते. परदेशी मुले एकमेकांना मदत करीत होते.
युक्रेनच्या बॉर्डर बाहेर पाच हजार मुले 34 तास थंडीत उणे 2 डिग्री तापमानात उभी होती. माझ्या काही मैत्रिणींचे पेपर फेकून दिले त्यांना मारले. आत जाऊन देत नव्हते. कालपासून त्यांना थोडी फार एंट्री दिली जात आहे. किव्हमधल्या मुलांना काढले पण सुमीसिटीमध्ये बॉम्ब हल्ले होत असल्याचा माझ्या मैत्रिणीचा फोन होता, पण त्या मुलांना अजून काहीच मदत नाही. खारकीव्हची अर्धी मुले अडकली आहेत. तीन दिवसांपासून ती मेट्रो किंवा बंकरमध्ये आहेत. खायला आणायला बाहेर पडले की, बॉम्ब हल्ला सुरू होतो, मग धावत पुन्हा बंकरमध्ये यावे लागते.
युध्द सुरू झाल्याचे समजल्यापासून घराचे सगळे काळजीत होते. मी बॉर्डर क्रॉस केल्यावर आईला सांगितले आम्ही सुरक्षित आहोत तरी आईच्या मनात धाकधुकी होती मी कधी येणार काय चालले आहे? काय होणार? अखेर मी घरी आले म्हणून चांगले वाटले. मी नि:श्वास सोडला कारण मी घरी आल्यावर तेथील परिस्थिती खूप बिघडली आहे, पण आता मला वाटते माझे मित्र पण लवकर घरी यावेत. त्यांना आपल्या सरकारने लवकरात लवकर आणावे.
मला खूप भीती वाटत होती की माझी मुलगी कशी परत येईल. मुलगी 27 फेब्रुवारीला घरी आल्यावर मला खूप आनंद झाला. तिला मुंबईला विमानतळावर पाहिल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रु आले.
-देवयानी पवार, प्रचितीची आई