Breaking News

पोलादपूरचे अविकसित आदिवासी जीवन

रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान व सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत पोलादपूर तालुक्यातील सडवली गावातील समाज मंदिरामध्ये शुक्रवारी (दि. 18) सडवली, देवपूर, गांजवणे, खडपी, भोगाव, पैठण, कोंढवी येथील आदिवासी बांधवांकरिता कार्यक्रम झाला. तर पितळवाडी गावातील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहामध्ये मंगळवारी (दि. 22) केवनाळे, करंजे, साखर, देवळे येथील कातकरी महिला व पुरूषांचे एकत्रितपणे कातकरी उत्थान शिबिर घेण्यात आले. लोहारे, पार्ले, तुर्भे व दिविल येथील कातकरी बांधवांसाठी कातकरी उत्थानाचा तिसरा कार्यक्रम लोहारे येथील शंकर मंदिरामध्ये झाला. कापडे बुद्रुक, रानबाजिरे, चांभारगणी व आड या गावांसाठी चौथा कार्यक्रम गुरूवारी (दि. 3) कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झाला. या कार्यक्रमांची सांगता मंगळवारी (दि. 8) सवाद येथील शंकर मंदिरामधील कार्यक्रमाने झाली. यावेळी कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत सवाद, माटवण आणि हावरे येथील आदिवासी वाड्यांतील कातकरी महिला व पुरूषांच्या विविध आरोग्य तपासण्या तसेच लसीकरणासह महसुल विभागाकडून देण्यात येणारे विविध दाखले, मनरेगा जॉब कार्ड तसेच कातकरी कुटूंबांच्या रेशनकार्ड संबंधित कामे करण्यात आली. मात्र खर्‍या अर्थाने जनगणनेबाहेरील लोकसंख्येला प्रवाहासोबत आणण्यासाठी राज्यसरकारच्या अनुभवी आणि उच्चशिक्षित प्रशिक्षित प्रशासकीय अधिकार्‍यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्यातील आदिवासी जमातीची जीवन पध्दत अद्याप अविकसित आणि असंघटीत असल्याचे दिसून येत आहे. आदिवासी वाड्या, आदिवासी शाळा आणि आदिवासींची श्रमशक्ती हा तालुक्याच्या गतिमानतेचा अविभाज्य भाग असला तरी तो केवळ या जमातीच्या शोषणावरच अवलंबून आहे. त्यांचे घटनात्मक हक्क देण्यास अन्य समाज पुढाकार घेण्याऐवजी ते हक्क बळकाविण्यातच धन्यता मानतात.
-आरोग्यविषयक अनास्था : पोलादपूर तालुक्यातील दूर्गम भागात डॉक्टर पोहोचत नसताना काही बोगस डॉक्टर्स मात्र कितीही दूर्गम भाग असला तरी तेथे पोहोचून रुग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. परिणामी, वैद्यकीय सेवेवरील विश्वासार्हतेपेक्षा त्यांची अनुपलब्धताच आदिवासी समाजातील वैदूंना उपचारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ग्रामीण व आदिवासी भागात नालगूद, कावीण, धूपनी, धावरा, मोड, दमा, हातपाय सुजणे, कावीळ, अंगावरून जाणे, पोटदूखी, फोड येणे, हगवण, ताप, खोकला, सर्दी, वात, मुडदूस, जुलाब, लहान मुलांना डबा होणे, उलटी, खरूज अशा विविध आजारांवर उपचारांसाठी नाणेघोळ येथे खेळाजी वाघे, कृष्णा वाघे, कापडे येथे महादेव पवार, अनुसया पवार, नामदेव काळे, माटवण येथे रघुनाथ वाघमारे, मधु मुकणे, कोंढवी येथे मारूती मुकणे, सुरेश मुकणे, गांजवणे येथे बापूराम पवार, वनिता पवार, हावरे येथे अर्जून पवार, पैठण येथे बबन जाधव, पोलादपूर येथे सहदेव पवार, लिला पवार, लोहारमाळ येथे सायबू जाधव, सडवली येथे भगवान कोळी, लक्ष्मी कोळी, पार्ले येथे लल्या वाघमारे, वसंत वाघे, दत्ता पवार, कुशी मुकणे, देवपूर येथे चंद्रकांत निकम आणि आड येथे महादेव पवार आदी वैदूंकडे जातात, असे एका सामाजिक संस्थेच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. यातही काही वैदू मोफत उपचार करीत असून गुरूंची तशी आज्ञा असल्याची सांगतात. अनेक डॉक्टर्स मात्र आदिवासी रुग्णांना परस्पर वाटेला लावतात, असा विरोधाभास तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जून 2011 च्या मासिक अहवालातून मध्यम कमी वजनाची नऊ लाख 73 हजार 667 बालके आणि तीव्र कमी वजनाची एक लाख 26 हजार 240 बालके राज्याच्या ग्रामीण भागात असल्याचे दिसून आले आणि त्याच वर्षी 16 ऑगस्टला महाड ग्रामीण रुग्णालयातच मध्यरात्रीच्या सुमारास उर्मिला शिर्‍या मुकणे या इयत्ता तिसरीतील आठ वर्षीय कुपोषित मुलीचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्रामअभियान हे तालुक्यासाठी महत्वपूर्ण आहे. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत मुलांचे पोषण व आरोग्य स्थितीत सुधारणा करणे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी या अभियानांतर्गत लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, पूरक पोषण आहार, महिलांचे आरोग्य व पोषण तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण अशा सेवांसोबत आदिवासींमध्येही जनजागृतीचे प्रयत्न होण्याची
गरज आहे.
-संवर्धित वनांसाठी अनास्था : पोलादपूर तालुक्यातील जंगल आणि इकोसेन्सेटिव्ह प्रदेशामध्ये वनौषधींची उपज निसर्गत:च आहे. आदिवासींना या वनौषधींचा वापर आणि पारख पूर्वापार आहे. आदिवासी केवळ जंगलातून पावसाळ्यात आळंब्या आणतात आणि उन्हाळ्यात ओले काजू, आंबे आणि फणस घाऊक व्यापार्‍यापर्यंत पोहोचवून उदरनिर्वाह करतात, हा अलिकडील व्यापारी समज या समाजाला पूर्वापार व परंपरागत वनौषधी ज्ञानापासून दूर करण्यास कारणीभूत ठरला आहे. सोबतच तालुक्यातील वनजमिनीवरील वनौषधींचा र्‍हास करणारी मातीचोरी व डोंगर सपाटीकरणाची यंत्रे वैदूंच्या सेवेवर अनिष्ट परिणाम करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेऊन वनवासींसाठी संवर्धित वनांची संकल्पना अस्तित्वात आणण्याची गरज आहे.पोलादपूर तालुक्यातील करंजा, रानघेवडा, जांभूळ, जंगली पडवळ, अडूळसा, घाणेरी, पांढरा केवडा, हिरडा, बेहडा, तिसंल, गुलाबजांबू, घोळ, वासनवेल, रानकपास, चिकणा अतिवळा, चौचण, चिरफळ, निबारा, कोसिब, कोबी, नाना नाग्या, शिमली, सहदेवी, पापडी, गोरखमुंड, भृंगराज, माका, कंबरमोडी, काटेसावरी, अमरूल, मुरूडशेंग, जंगलीभेंडी, जास्वंद, पिवळा धोतरा या वनस्पती आता फारच दूर्मिळ झाल्या असून केवळ वड, पिंपळ, औदूंबर, तीळ, मेंदी, गुलराम, कारवी, पिवळी कोराटी, रक्तलोहित, वारस, रानपोपटी, नांदूर, फणस, आंबा, रानफणस,बोगनवेल, एरंड, चंदन, आसाणा, केकतड, खुड्यानाग, रामदातून, घोटवेल, केव्हे, माड, नागरमोथा, साग, ब्रह्मदांडी, संकेश्वर अनानीवेल, उपरसाल, रूई, तुळतुळी, किंजळ या वनौषधींचा साठा तालुक्यातील रेडेखाचर, दत्तवाडी, तुर्भेखोंडा, हावरे, वाकण, ढवळे, बोरघर, किनेश्वर, कुडपण, परसुले, काटेतळी, सडवली आदी भागांतील जंगलामध्ये मुबलक प्रमाणात आढळून येत आहे. काही वर्षांपूर्वी या वनौषधींची आदिवासींकडून अन्य भागातील फुटकळ व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात विक्री होत असे. मात्र, त्याकामी मिळणारा मोबदला फारच अत्यल्प असल्याने आदिवासींनी ही विक्री बंद केली. आता स्थानिक वैदूंना या वनौषधींचा शोध घेताना त्या दूर्मिळ झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम, एकेकाळी तालुक्यातील वैदूंची प्रभावी ठरलेली आरोग्य उपचारपध्दती वनौषधीअभावी निष्प्रभ ठरू लागली असून रूग्णांना गुण न आल्याने डॉक्टरांकडे जाणे अपरिहार्य ठरत आहे.
-जीवन असंघटीत : दारूचे दुष्परिणाम, बालविवाह, अंधश्रध्दा यामुळे समाजाचे आणि आदिवासी कुटूंबाचे विशेषत: महिलांचे होणारे नुकसान याबाबत समाजप्रबोधन करणार्‍या यंत्रणा पोलादपूर तालुक्यात अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील आदिवासी समाज अविकासित आणि असंघटित राहात असून माणूस म्हणून जगण्याच्या संघर्षात त्यांची झेप आता आला दिवस जगण्याच्या मरगळीत बदललेली दिसून येत आहे.
-शैलेश पालकर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply