Breaking News

सराव सामन्यांची भारताची मागणी ‘ईसीबी’कडून मान्य

लंडन ः वृत्तसंस्था
भारतीय संघातील खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यानंतर 20 दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. न्यूझीलंडकडून फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली याची एक मागणी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मान्य केली आहे.  
डब्ल्यूटीसी फायनलनंतर पुरेसा सराव न मिळाल्याची खंत विराटने व्यक्त केली होती. त्याचवेळी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी आयोजित सराव सामना का रद्द केले याबाबतही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बीसीसीआयने ईसीबीशी पुन्हा चर्चा केली आणि आता भारतीय संघासाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करणार असल्याची बातमी समोर येत आहे. ईसीबीने चार दिवसीय दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना डरहॅम येथील एमिरेट्स रिव्हरसाईड येथे एकत्र येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
टीम इंडियासाठीचे दोन्ही सराव सामने डरहॅम येथे खेळवले जातील. पहिला सराव सामना कोणत्या क्लबविरुद्ध होईल हे अद्याप ठरलेले नाही, पण दुसर्‍या सराव सामन्यात टीम इंडिया कौंटी स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंचा सामना करेल. ’टीम इंडियासाठी सराव सामन्याच्या आयोजनासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच हे सामने खेळण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल,’ असे ईसीबीच्या प्रवक्त्यांनी ‘डेली मेल’ला सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply