उरण : प्रतिनिधी
दर वर्षाला सुमारे साडेतीन-चार कोटींची उलाढाल असलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) सध्या काही संचालकांनीच सुरू केलेल्या बेकायदेशीर, आणि नियमबाह्य कामामुळे भ्रष्टाचाराची किड लागली आहे. संचालकांच्या या भ्रष्टाचारी कारभारामुळे मात्र आर्थिक नुकसान होत असल्याने बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
शेतकर्यांच्या हितासाठी आणि कृषी मालाला योग्य भाव मिळावा यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे. बाजार समितीचे सुमारे 250 मोठे तर 300 मिळून जवळपास 550 गाळे आहेत. शेतकर्यांचा नाशिवंत माल सुरक्षित ठेवण्यासाठी बाजार समितीने 10 वर्षांपूर्वी आठ गुंठे क्षेत्रावर तीन मजली शीतगृहाची इमारत उभी केली आहे. साधारणतः एक हजार 350 मेट्रिक टन क्षमतेची शीतगृहाची इमारत उभारण्यासाठी नाबार्डकडून दोन कोटी कर्जही घेतले आहे. या शितगृहामुळे शेतकर्यांचा नाशिवंत माल सुरक्षित ठेवण्यासाठी चांगलीच मदत झाली होती, मात्र हे शीतगृह मागील चार वर्षांपासून धुळखात पडून आहे. बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शीतगृह भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला पणन विभागाकडून परवानगी दिली आहे, मात्र चार वर्षांच्या कालावधीतही शीतगृहाला भाडेकरू लाभलेला नाही. यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. आता मात्र आठ – दहा महिन्यांपूर्वी शीतगृहाच्या बाजुलाच असलेल्या सरंक्षण भिंतीला लागूनच 30 फुटबाय 10 फुट क्षेत्रफळाचे बेकायदेशीरपणे सहा गाळे बांधण्यात आले आहेत.
खरेतर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या बांधकामासाठी पणन संचालक मंडळ पुणे यांची सेक्शन 12 (1) प्रमाणे परवानगी घेणे बंधनकारक आहे तसेच महापालिकेची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे, मात्र या दोन्हीचीही परवानगी न घेताच या सहा गाळ्यांचे बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले आहे. इतक्यावरच न थांबता बाजार समितीच्या काही संचालकांनी सहकार्यांच्या विरोधाला न जुमानता सहापैकी पाच गाळे प्रत्येकी 15 लाख किमतीला विकले आहेत.
गाळे विक्रीसाठी नियमानुसार रितसर निविदा काढण्याची आवश्यकता होती, मात्र निविदा न काढताच पाच गाळ्यांची विक्री करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून काही संचालकांनी चांगलीच कमाई करून बाजार समितीची लुबाडणूक केली असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. बाजार समितीमध्ये 250 मोठे तर 300 तरपट गाळे आहेत. या मोठ्या गाळ्यात बाजार समितीच्या काही संचालकांनी पोट भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले जात आहेत.
बाजार समितीच्या सभापतीपदी नऊ महिन्यांपूर्वीच रुजू झालो आहे. त्यामुळे याआधी काय झाले आहे याची कोणतीही माहिती नाही. -दत्तात्रेय पाटील, सभापती, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती.
शीतगृहासाठी पणन विभागाकडून परवानगी घेण्यात आली आहे, मात्र कंपाऊंड वॉलला लागुन बांधण्यात आलेल्या आतील गाळ्यांच्या बांधकामासाठी परवानगीची आवश्यकता नाही. माहिती देण्यासाठीही माझ्यावर काही बंधने आहेत. त्यामुळे सभापतींच्या परवानगीशिवाय अधिक माहिती देणे शक्य नाही. तुम्ही सभापतींशी संपर्क साधा. -भरत पाटील, सचिव, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती.