Breaking News

कोरोनाबळींचा आकडा लपवला जातोय

आमदार प्रशांत ठाकूर यांचा आरोप

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त आहे. प्रशासन कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचा आकडा लपवत आहे. याचा त्रास रायगड जिल्ह्यातील लोकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप भाजप उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) येथे केला.
रायगड जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील माहिती घेण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते, तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, सतिश लेले, अशोक वारंगे, अ‍ॅड.  अंकित बंगेरा या वेळी उपस्थित होते.
शासन राज्य कोरोनामुक्त करण्याची भाषा करीत आहे, पण त्यासाठी कार्यक्रम आखलेला नाही. केवळ कागदावर मुक्तता दाखविली जात आहे. आम्हाला प्रत्यक्षात मुक्ती हवी आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त आहे. शासन आकडे लपवत आहे. 24 मे रोजी ज्या महिलेचा मृत्यू झाला, तिचा हा मृत्यू इतर रोगाने झाला असे त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या मृत्यूच्या अहवालात नमूद करण्यात आले, मात्र जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या अहवालात तिचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
राज्य शासन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी काय उपाययोजना करतेय, याची कोणालाच माहिती नाही. राज्य शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय नाही. राज्य शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
पनवेल महानगरपालिका मुंबईला लागून आहे. येथील लोक अत्यावश्यक सेवेत काम करण्यासाठी मुंबईत जातात. त्यामुळे कोरोनाची लागण होते. त्यांच्या घरातील लोकही बाधित होत आहेत. परिणामी पनवेलची रुग्णसंख्या वाढत आहे. आता टाळेबंदी जवळजवळ उठविण्यात आली आहे. त्यामुळे लोक येत आहेत. 15 मेनंतरच कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे आमदार ठाकूर म्हणाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply