रसायनी : प्रतिनिधी
विविध कारणांनी दीर्घ सायकल प्रवास करणारे जगभरात सध्या अंदाजे 1700 सायकलवीर आहेत. यात दिल्लीहून 25 ऑगस्ट 2018 रोजी सायकलवरून भारत भ्रमंतीसाठी निघालेला 23 वर्षीय पदवीधर तरुण आफताब फरीदी 18 मे 2018 रोजी रसायनीतील भटवाडी येथे अक्षर मानव ग्रंथालय अध्यक्ष रोहिदास कवले यांच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याचे स्वागत करण्यात आले.
आफताब रसायनीत पोहोचला तेव्हा भारताच्या 25 घटक राज्यांतून 23,950 किमीचा प्रवास झाला होता. या वेळी सायकलभ्रमणविषयी माहिती घेतली असता आफताब भविष्यात सेवेत येणार्या सैनिकांच्या सन्मानासाठी ही भारतभर सायकल भ्रमंती सुरू केली आहे. यापुढे गुजरात, राजस्थानची भ्रमंती करून 15 जूनला तो दिल्लीत पोहोचेल. आफताबची सायकल ही मूळची तैवानची आहे. तो सायकलीला ‘अॅनी’ म्हणून संबोधतो. दीर्घ प्रवासात अॅनीची साथ महत्त्वाची ठरली. भारतीयांचे दिल मोठे आहे. त्याला भारत सफरीत एकात्मता दिसल्याचे आफताब म्हणतो.
प्रवासातील काही आठवणी सांगताना आफताब म्हणाला, ब्रह्मपुत्रा नदी ओलांडत असताना काही चोरांनी अडवले. माझ्या प्रवासाबद्दल त्यांना कळले तेव्हा त्यांनी मला लुटले नाही. त्यांनी मला जेवण देऊन पैसेही दिले. मला चोरांमध्येही माणूसकी पाहायला मिळाली. शहरामध्ये आंघोळीसाठी चार-चार बादल्या पाणी आणि खेड्यामध्ये पिण्यासाठी एक बादली पाणी मुश्किलीने मिळते. ही विषमताही आफताब फरिदीने सांगितली.