रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज
अलिबाग : प्रतिनिधी
माणगाव येथे शिवसेनेचा रायगड जिल्ह्याचा मेळावा बुधवारी (दि. 30) सायंकाळी 4 वाजता टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. रायगडातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी एकत्रित येत गेली तीन महिन्यांपासून
रायगडातील पालकमंत्री हटावची घोषणा केली होती. या मेळाव्यात आदित्य ठाकरे या मागणीवर काहीही भाष्य न केल्याने उपस्थित शिवसैनिकांमध्ये निराशा जाणवली.
आदित्य ठाकरे यांनी मेळावा संपल्यानंतर सुतारवाडी येथे तटकरे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीबाबत शिवसैनिकांनी चक्क नाराजी दर्शवली असल्याची चर्चा गुरुवारी जिल्ह्यात रंगू लागली. शिवाय या जाहीर मेळाव्याला रायगडचे माजी खासदार अनंत गीते उपस्थित राहिले नसल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
मेळाव्याची नियोजित वेळ सायंकाळी 4 वाजता होती, मात्र नियोजित वेळेनुसार आदित्य ठाकरे तब्बल अडीच तास उशीरा आल्याने कार्यकर्ते व नागरिकांना
त्यांची वाट बघत ताटकळत रहावे लागले. मार्च महिन्यात उष्म्याचा वाढलेला पारा या परिस्थितीतही ग्रामीण भागातील महिला व पुरुष यांना गाड्यांमधून दुपारी दोन वाजल्यापासून मेळाव्याला आणण्यात आले होते. महामार्गापासून आतमध्ये सुमारे आर्धा किमी आत मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने अनेकांनी मेळाव्या ठिकाणी पोहचेपर्यंत धापा टाकल्या. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हटाव पालकमंत्री बदला असा ओरड केला, परंतु याचा काही एक परिणाम झाला नाही. आदित्य ठाकरे
यांनी यावर काहीच भाष्य न करता केवळ पक्षाचा उदोउदो केला.