Breaking News

तीन दिवसानंतर बलाप ग्रामस्थ गावात परतले

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ तीन दिवसांसाठी गावाबाहेर राहण्यासाठी गेले होते. ते रविवारी (दि.5)पुन्हा आपापल्या बलाप गावातल्या घरी परतले. दर नऊ वर्षांनी येणार्‍या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला बलाप गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव सोडतात. आणि गावाबाहेर वेशीवर शेतात खोपटे किंवा झोपड्या करून साधारण तीन दिवस राहतात. या दिवसात गावात भुतप्रेत किंवा आत्मा यांचा संचार असतो, असा ग्रामस्थांचा समज आहे, तर काहींच्या मते सर्वांनी एकत्र येण्याचे हे एक माध्यम आहे. या प्रथेमागचे कारण काही का असेना, पण जवळपास 80वर्षांहून जुनी आणि दर नऊ वर्षांने येणारी ‘रीघवनी‘ परंपरा गावकरी आजही जोपासत आहेत.

शुक्रवारी (दि.3) सकाळी 7 वाजता बलाप ग्रामस्थ गावाबाहेर पडले होते. गावाबाहेर सुमारे 35 झोपड्या (खोपटे) उभारुन  अंदाजे 300 अबाल-वृद्ध तेथे राहत होते. रविवारी (दि. 5) सर्व ग्रामस्थ पुन्हा आपापल्या बलाप गावातल्या घरी परतले आहेत. नोकरी, व्यवसायामित्ताने मुंबईत राहात असलेले बलाप ग्रामस्थही या प्रथेसाठी आले  होते. सर्वजण एकत्र येऊन मजा व मनोरंजन करणे असे सध्या या प्रथेचे स्वरूप आहे. या तिन दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात, असे ग्रामस्थ राजेंद्र खरीवले यांनी सांगितले.

– पूर्वी गावात साथीचे रोग आल्यावर त्या रोगाच्या विषाणूंचा  प्रसार होऊ नये, म्हणून सर्व लोक गावाबाहेर जायचे. मात्र त्यांनतर त्याला भुतप्रेत ही अंधश्रद्धा जोडली गेली. मात्र आम्ही या परंपरेमागचे मुळ कारण साथीचे रोग असल्याचे शोधले आहे. या पाठीमागे कोणती भीती, अंधश्रध्दा किंवा अघोरी प्रथा नाही.

 -किशोर खरीवले, उपसरपंच,

बलाप, ता. सुधागड

– संसर्गजन्य रोगाची साथ आल्यावर गाव रिकामे करून गावाबाहेर राहिल्यानंतर साथ आटोक्यात येते, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे गाव टाकणीसारख्या रूढी-परंपरांची चिकित्सा करणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत या ग्रामस्थांबरोबर संवाद साधून, याबाबत प्रबोधन केले जाईल.  -मोहन भोईर, कार्याध्यक्ष,  अंनिस जिल्हा रायगड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply