श्रीवर्धन : प्रतिनिधी
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सहा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, काही ठिकाणी विंधण विहीर खोेदण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकून 49 गावे व 108 वाडया त्यापैकी साक्षीभैरी, कोढें पंचायतन, शेखाडी, साखरी, गुळधे, बापवली, नागलोली, आदगाव व धनगरमलई या गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, तहसिलदार जयराज सुर्यवंशी व गटविकास अधिकारी बाबुराव भोगे यांनी सयुंक्तपणे या गावाची पहाणी करून तेथे तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर उपलब्ध करुन दिले आहेत. पंचायत समितीच्या कार्यालयाजवळील विहिरीमधील पाणी टँकरमध्ये भरून ते टंचाई ग्रस्त गावांमध्ये रवाना केले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यामध्ये टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, बोअरवेल मारण्याचे कामही सुरू झाले आहे. कोणतेही गाव, वाडी, आळी पाण्यापासून वंचित राहणार नाही, महिलांना पाण्यासाठी फिरावे लागणार नाही, यासाठी प्रशासन सर्वेतापरी काळजी घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी बाबुराव भोगे यांनी दिली.
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना 6 टँकरने पाणी पुरवठा केला जाईल. तसेच तालुक्यामध्ये यावर्षी 12 विंधन विहिरी मारण्यात येणार आहेत. त्यासाठी 5 लाखाचे निधी मंजुर करण्यात आला आहे. बोर्लीपंचायत गावामधील चिंचबादेवी येथे विंधन विहीर मारण्यात आली असुन उर्वरित 11विंधन विहिरी येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शेखाडी, वडशेतवावे, आदिवासीवाडी, नागलोली, गुळधे या ठिकाणी मारण्यात येतील.
-बाबुराव भोगे, गटविकास अधिकारी, श्रीवर्धन.