आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; ग्रामस्थांनी मानले आभार
उरण : प्रतिनिधी
जेएनपीटी बंदर प्रशासनाने उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांचे नव्याने काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोनारी गावातील ग्रामस्थांनी या काँक्रीटीकराणाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
जेएनपीटी बंदराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यांचा त्रास हा गावातील रहिवाशांना सहन करावा लागत होता. याचे गांभीर्य तातडीने लक्षात घेऊन सोनारी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पूनम कडू, सोनारी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनेश तांडेल, ज्येष्ठ नागरिक नरेश कडू यांनी गावकर्यांच्या मदतीने आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी बंदर प्रशासनाकडे सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल जेएनपीटी बंदर प्रशासनाने घेऊन सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील भालचंद्र यशवंत कडू ते शोभा रविंद्र म्हात्रे, मधुकर पांडुरंग तांडेल ते नरेश यशवंत कडू, प्रथमेश कडू ते अमर पाटील आणि रमेश कडू ते विजय कडू यांच्या घराजवळील अंतर्गत रस्त्यांचे नव्याने काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेऊन पूर्णत्वास नेले आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांचे नव्याने काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केल्याने सरपंच पूनम कडू तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनेश तांडेल, ज्येष्ठ नागरिक नरेश कडू यांनी सोनारी ग्रामस्थांच्या वतीने बंदर प्रशासनांचे व आमदार महेश बालदी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.