Breaking News

पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे तलावाजवळ असलेल्या गणेश भाजी मार्केटमध्ये कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनचे उद्घाटन महापौर नितीन पाटील आणि उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या हस्ते गुरुवारी (दि.5) करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक दशरथ म्हात्रे, इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या एसी मेंबर डॉ. शोभा पालेकर, वर्षा ठाकूर यांच्यासह क्लबच्या सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत आहे. प्लास्टिक कचर्‍यामुळे नाले तुंबणे, जनावरांना होणारे नुकसान तसेच माती आणि पाण्याचे प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पर्यावरणपूरक पर्याय सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
भाजी मार्केटमध्ये येणार्‍या ग्राहकांना या व्हेंडिंग मशीनद्वारे 10 रुपयांचे नाणे टाकून सहजपणे कापडी पिशवी खरेदी करता येणार आहे. कापडी पिशव्या टिकाऊ, पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढण्यासही हातभार लागणार आहे.
इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून हा उपक्रमही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकमुक्त समाज घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन क्लबच्या प्रेसिडेंट शुभांगी पिंपळकर व सेक्रेटरी डॉ. अमृता नाईक यांनी केले.

Check Also

रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात

विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …

Leave a Reply