Breaking News

स्थानिक बियाणांच्या संवर्धनासाठी तरुणांची धडपड

बाजारात गेल्यावर हिरव्यागार दिसणार्‍या भाज्या आपले  लक्ष वेधून घेतात. मात्र या सर्व भाज्या संकरित बियाणांच्या असतात. संकरित बियाणांच्या शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे  स्थानिक  पारंपरिक बियाणे लुप्त होत चालले आहे. या स्थानिक पारंपरिक बियाणांचे संवर्धन करण्याचे  तसेच शेतीतील जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस ग्रामपंचायतीमधील  तरूण करत आहेत.  

अकरा तरूणांनी  एकत्र  येऊन डिगस-चोरगेवाडी येथे स्थानिक बियाणे बँक स्थापन केली आहे. या 11 पैकी  नऊ जण  मुंबईत शिकलेले, मुंबईतच नोकरी करत होते. हे सर्व तरुण मुंबईतील नोकरी सोडून आपल्या मुळगावी आले आहेत. हे बियाणे बँक ते चालवत आहेत. या बियाणे बँकेत 52 प्रकारच्या स्थानिक जातीच्या भाताची बियाणे आहेत. 38 प्रकारच्या पालेभाजी, शेंगभाजी, फळभाजी, कंदमुळे यांची बियाण आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे. शेतकर्‍यांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मुळे तरुण प्रयोगशील शेती करण्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते, औषधांची मात्रा द्यावी लागते. परंतु बियाणे चांगले असेल तर पीकही चांगले येते. यासाठी चांगली दमदार बियाणे असावी लागतात. संकरीत बियाणांमुळे उत्पादकता कमी झाली आहे. संकरीत बियाणे वापरण्यापेक्षा त्या भागातील वातावरणात टिकू शकतील, वाढू शकतील अशा वाणांची शेती केली पाहिजे. मात्र या स्थानिक जाती आता नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या स्थानिक पारंपरिक बियाणांचे संवर्धन व जतन करण्यासाठी हे ध्येय्यवेडे तरूण शहराकडून गावाकडे आले आहेत.

बियाणे हा शेतीचा आत्मा आणि सर्वात महत्त्वाची निविष्ठा असून गेल्या हजारो पिढ्यांपासून शेतकर्‍यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या. सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न आणि पोषण सुरक्षा, आर्थिक उन्नतीसाठी वापर केला. परंतु सध्या सुरु असलेल्या एकांगी पध्दतीच्या पीक वाण सुधारणा कार्यक्रमामुळे अनेक पीक जातीमधील विविधता अत्यंत दुर्मिळ झाली आहे. आता काही निवडक पीक जातींनी हजारो एकर जमीन व्यापून टाकली आहे, त्यामुळे ही जैवविविधता धोक्यात आली आहे. पिकांमधील जनुकीय विविधताही पिकवाण विविधता टिकविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे या तरुणांनी बोलताना सांगितले.

वातावरण बदलाच्या परिस्थितीत अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा हे संकट आपल्यासमोर ठाकले आहे. आजही विविध पिकांचे स्थानिक वाण त्यांच्या वैशिष्ट्यपुर्ण गुणधर्मामुळे टिकून आहेत. आता गरज आहे ती अशा वातावरण बदलात तग धरणार्‍या, पोषण समृध्द आणि रोगकिडीस प्रतिकारक स्थानिक वाणांचा शोध घेऊन लोक सहभागातून संवर्धन आणि पुनरुजीवन करण्याची. महाराष्ट्र हे कृषी जैवविविधतेने समृध्द राज्य आहे. ज्यामध्ये वनस्पती, प्राणी, पिके इत्यादिंचा  समावेश होतो आणि आता या अमुल्य जैवविविधतेचे संवर्धन आणि जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बायफ डेव्हलपमेंट फौउंडेशन पुणेमार्फत पिकांच्या स्थानिक वाणांचे आणि जंगली अन्न वनस्पतीचे संवर्धन आणि व्यवस्थापन कार्यक्रम 2009 मध्ये सुरु झाला. ज्यामध्ये पिकांच्या स्थानिक वाणाबद्दलचे ज्ञानाचे संकलन, शास्त्रीय अभ्यास, बिजोत्पादन, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्था हे मुख्य हेतू समोर ठेवले. त्यानंतर एप्रिल 2014 पासून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, शासन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रम, अंतर्गत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात सुरु झाला. या कार्यक्रमामध्ये भात, नाचणी, वरई, राळा, मोरबंटी, वाल-घेवडा, मका, ज्वारी, चवळी, भाजीपाला पिके, कंदपिके, तसेच जंगली भाज्या, जंगली फळे इत्यादिंचे सर्वेक्षण, संवर्धन आणि उत्पादन असा कार्यक्रम हाती घेतला. त्याचबरोबर गुजरात, उत्तराखंड आणि ओरिसा राज्यातही सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार आणि नंतर अ‍ॅग्रीकार्ट शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत मे 2019पासून राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये भात, नाचणी, भाजीपाला पिके, कडधान्ये इत्यादिंच्या 90 च्या वर वाण संवर्धित करुन बिजोत्पादन  आणि विक्री सुरु केली आहे, अ‍ॅग्रीकार्ट शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिव सचिन चोरगे यांनी सांगितले.

या बियाणे बँकेत अर्थातच भाताची बियाणे जास्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळा किंवा वालयी या जातीच्या भातीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असे. या भाताची पेज चवदार असते.त्यामुळे त्या भाताला मागणी आहे. परंतु हल्ली या भाताचे उत्पादन फार कमी घेतले जाते. शहरांमध्ये पेजेसाठी  या भाताला भरपूर मागणी आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे या भाताला दर चांगला मिळतो. ही बाब  या तरुणांनी येथील शेतकर्‍यांना समजावून सांगितली.  तुम्ही या भाताचे उत्पादन घ्या. आम्ही तुम्हाला बियाणे पुरवतो. तुम्हाला तंत्रज्ञान देतो. तसेच तुम्ही उत्पादीत केलेला माल विकत घेतो असेही या तरुणांर्नी  शेतकर्‍यांना सांगितले. शेतकरी बेळा आणि  वालयी भाताची लागवड करू लागलेत. त्यांना चांगले उत्पन्नदेखील मिळू लागले आहे. मुंबईत राहून कुणाची नोकरी करायची नाही. आपल्याच गावात प्रयोगशील शेती करायची. या उद्देशाने हे तरुण  मुंबईतून आपल्या गावी परत आले. आज हे तरूण शेतीतूनच चांगले उत्पन्न मिळवत आहेत.  त्यांच्यामुळे इतर तरुणही  शेतीकडे वळू लागले आहेत.स्थानिक बियाणे बँकेचे उपक्रम कोकणात अन्यभागांमध्ये देखील राबविले गेल्यास  कोकणातील शेतीतील जैवविविधतेचे संवर्धन तसेच पारंपरिक बियाणांचे जतन होईल.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply