अलिबाग : प्रतिनिधी
रसायनी येथील एचओसी व बीपीसीएल कंपनी परिसरात 31 माकडे व 15 कबुतरे मृत पावल्याची घटना 15 डिसेंबर 2018 रोजी उघडकीस आली होती. त्या मृत माकडे व कबुतरांच्या शरीराचे भाग फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात माकडे व कबुतरे यांच्या पोटात विष नसल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर पशु वैद्यकीय अधिकार्यांनी माकडे व कबुतर यांचा मृत्यू ब्रेन हॅम्ब्रेजने झाला असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही अहवाल पनवेल कोर्टात सादर करणार असल्याचे सहाय्यक वन अधिकारी नंदकिशोर कुप्ते यांनी सांगितले.
15 डिसेंबर 2018रोजी रात्रीच्या वेळी रसायनी येथील एचओसी व बीपीसीएल कंपनीत वायुगळती झाली होती. या वायुगळतीने बाजूच्या परिसरात असलेली 31 माकडे व 15 कबुतर हे मरण पावले. त्यानंतर कंपनी प्रशासनाने गुपचूप हे सर्व मृत प्राणी जमिनीत खड्डा करून गाडले. ही बाब बाहेर आल्यानंतर मीडियाने हा मुद्दा उचलून धरला होता. या घटनेनंतर वन अधिकारी, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर कंपनीतील सात अधिकार्यांना रसायनी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पनवेल येथील पशुवैद्यकीय अधिकार्यांनी मृत प्राण्यांचे पोस्टमार्टम केल्यानंतर त्यांचा मृत्यू ब्रेन हॅम्ब्रेजने झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर वनविभागाने मृत प्राण्यांचे शरीराचे भाग फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविले होते. फॉरेन्सिक लॅबकडून याबाबतचा अहवाल आला असून मृत प्राण्यांच्या शरीरात विष नसल्याचे निष्पन्न झाले आहे. वन विभागाकडून याबाबतचा तपास पूर्ण झाला असून आठ दिवसांत फॉरेन्सिक लॅब व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला अहवाल न्यायालयाकडे सादर करणार असल्याचे सहाय्यक वन अधिकारी नंदकिशोर कुप्ते यांनी सांगितले.