नवी मुंबईत डेंग्यूचा रुग्ण नसल्याचा दावा

मागील वर्षीच्या तुलनेत साथ आटोक्यात

नवी मुंबई ः प्रतिनिधी

दरवर्षी पावसाळा काळात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र या वर्षी हे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचा एकही रुग्ण शहरात सापडला नाही, तर मलेरियाचे फक्त नऊ रुग्ण सापडले आहेत. पालिकेकडून कोरोना काळातही याबाबत दक्षता घेतली जात असल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

दरवर्षी पावसाळा कालावधीत हिवताप, डेंग्यू  तसेच इतर जलजन्य आजार वाढतात. यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहिमा एप्रिलपासून नियमित स्वरूपात सुरू असतात. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबर रासायनिक धूरीकरणही करण्यात येते. आठवड्यातून दोनदा डास अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. या वर्षी सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी झटत असल्याने इतर साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊन हे आजार वाढतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र पालिका प्रशासनाने कोरोनाबरोबर साथरोग आजारांबाबतही दक्षता घेतल्याचा दावा पालिकेने केला आहे.

  डास उत्पत्ती स्थाने शोधमोहिमेत पाच लाख 35 हजार घरांना भेटी देण्यात आल्या असून 11 लाख 15 हजार 510 डास उत्पत्ती स्थानांची पाहणी करण्यात आली. यात तीन हजार 147 ठिकाणची डास उत्पत्ती स्थाने दूषित आढळली होती. यातील एक हजार 574 स्थाने त्वरित नष्ट करण्यात आली असून एक हजार 573 स्थानांवर डास अळीनाशक फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे इतर साथीच्या आजारांचे प्रमाण कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरदरम्यान ताप, खोकला, सर्दीचे एकूण रुग्ण एक लाख 21 हजार 686 होते, तर या वर्षी ऑगस्टपर्यंत 69 हजार 832 इतकेच रुग्ण आहेत. यात गेल्या वर्षी मलेरियाचे 52 रुग्ण सापडले होते. या वर्षी फक्त नऊ रुग्ण आहेत, तर डेंग्यूचे गेल्या वर्षांत सात रुग्ण होते, या वर्षी एकही रुग्ण नाही. डेंग्यू संशयित फक्त पाच रुग्ण आहेत.

साथरोगाबाबत पालिका प्रशासन काम करीत असून या वर्षी रुग्णसंख्या कमी आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाबाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पालिकेकडून योग्य उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनी घरात एक दिवस पाणी साठवण्याची भांडी रिकामी करून ठेवावीत.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply