Breaking News

आई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी शनिवार, दि. 18 जून 2022 रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या आईविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारा सविस्तर ब्लॉगही लिहिला आहे. पंतप्रधान मोदींची जडणघडण, विचारसरणी आणि एकूणच संस्कारांमागील त्यांची मातृप्रेरणा शब्दबद्ध करणार्‍या या ब्लॉगचा हा संपादित अंश…

आई, हा केवळ एक शब्द नव्हे, आई तर आयुष्यातली अशी भावना आहे, ज्यामध्ये सामावल्या आहेत वात्सल्य, धैर्य, विश्वास आणि अशा अपार भावना जगातला कोणताही भाग असो, कोणताही देश असो, प्रत्येक मुलाच्या मनात आपल्या आईसाठी सर्वांत अनमोल स्नेह भावना असते. आई, आपल्याला केवळ जन्मच देते असे नव्हे, तर आपले मन, आपला आत्मविश्वास, आपले व्यक्तिमत्त्व ती घडविते. आपल्या मुलांसाठी ती आयुष्यभर झिजते, स्वतःला समर्पित करते. आज माझा आनंद, माझे भाग्य आपणा सर्वांसमवेत मी सामायिक करू इच्छितो. माझ्या आईने 18 जूनला वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश केला आहे. म्हणजेच आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. वडील आज असते, तर गेल्या आठवड्यात तेही 100 वर्षांचे झाले असते. म्हणजे 2022 हे असे वर्ष आहे, ज्यामध्ये माझ्या आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे आणि याच वर्षात माझ्या वडिलांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्याच आठवड्यात माझ्या पुतण्याने गांधीनगर इथून आईचे काही व्हिडिओ पाठविले आहेत. सोसायटीमधले काही युवक घरी आले आहेत. वडिलांचे छायाचित्र खुर्चीवर ठेवले आहे, भजन-कीर्तन सुरू आहे, आई तल्लीन होऊन भजन म्हणत आहे. टाळ वाजवत आहे. आई आजही तशीच आहे. शरीर भले थकले असले तरी मनाची ऊर्जा तशीच कायम आहे.

खरे तर आमच्याकडे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही, मात्र कुटुंबातली नव्या पिढीतली मुले आहेत त्यांनी वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षांत यावेळी 100 झाडे लावली. आज माझ्या जीवनात जे काही चांगले आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वात जे काही चांगले आहे, ती आई-वडिलांची देणगी आहे. आज मी इथे दिल्लीत बसलो आहे, कितीतरी जुन्या आठवणी मनात फेर धरत आहेत. माझी आई जितकी सामान्य आहे तितकीच असामान्यही आहे. जशी सर्वांची आई असते अगदी तशीच! आज मी आईविषयी लिहित आहे, ते वाचून तुम्हाला असे वाटू शकेल, माझी आईही असेच तर करते. हे वाचताना तुमच्या डोळ्यांसमोर तुमची आई येईल. आईची तपस्या, तिच्या अपत्याला आदर्श माणूस घडवते. आईचे वात्सल्य, तिच्या मुलामध्ये मानवी भाव-भावना जागृत करते. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, एक व्यक्तिमत्व नव्हे, तर आई म्हणजे एक स्वरूप आहे. आपल्याकडे म्हटले जाते जसा भक्त तसा ईश्वर. त्याप्रमाणेच आपल्या मनात जसा भाव असेल त्याप्रमाणे आपण आईचे स्वरूप अनुभवू शकतो.

माझ्या आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातल्या विसनगर इथे झाला. वडनगरपासून हे फार दूर नाही. माझ्या आईला तिच्या आईचे म्हणजे माझ्या आजीचे प्रेम लाभू शकले नाही. 100 वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक महामारीचा तेव्हा अनेक वर्षे प्रभाव राहिला होता. त्या महामारीने माझ्या आजीला, माझ्या आईपासून हिरावून नेले. आई तेव्हा काही दिवसांचीच असेल. तिला आपल्या आईचा, माझ्या आजीचा चेहरा, तिची कुशी काहीच आठवत नाही. आपण विचार करा, माझ्या आईचे बालपण आईविना गेले, तिला आपल्या आईकडे हट्ट करता आला नाही. आईने शाळेचा उंबरठाही पाहिला नाही, अक्षरज्ञान प्राप्त करण्याचे भाग्य तिला लाभले नाही. तिने पाहिली ती केवळ गरिबी आणि घरात चोहीकडे अभाव. आजच्या काळाशी तुलना केली, तर आपण कल्पना करू शकतो की, आईचे बालपण किती खडतर होते. कदाचित तिचे जीवन असेच घडवण्याची ईश्वराची इच्छा असेल. मात्र, आपली आई गमावल्याचे, तिचा चेहराही हिरावल्याचे दुःख तिला आजही सलते. लहानपणी केलेल्या संघर्षामुळे माझी आई अकाली प्रौढ झाली. आपल्या कुटुंबात ती सर्वांत मोठी होती आणि लग्न झाल्यावर ती सर्वांत मोठी सून झाली. लहानपणी ती आपल्या घरातल्या सर्वांची जशी चिंता करत असे, त्यांची काळजी घेत असे, घराचे सर्व कामकाज करत असे तशाच जबाबदार्‍या तिला सासरी आल्यावर तिच्या अंगावर आल्या. या सर्व जबाबदार्‍यांमध्ये, या समस्यांमध्ये आई नेहमीच शांतपणे प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाचा सांभाळ करत राहिली.

वडनगरच्या ज्या घरात आम्ही राहत होतो, ते घर अतिशय छोटे होते. त्या घराला खिडकी नव्हती, न्हाणीघर नव्हते, शौचालयही नव्हते. मातीच्या भिंती आणि खापराचे छत असलेला एक-दीड खोल्यांचा तो ढाचा म्हणजे आमचे घर होते. त्यामध्ये आई-वडील, आम्ही सर्व बहीण-भावंडे राहत होतो. त्या छोट्याश्या घरात आईला स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे म्हणून वडिलांनी घरात बांबूच्या पट्ट्या आणि लाकडाच्या फळ्या टाकून मचाणासारखे एक तयार केले होते. हे मचाण आमच्या घरातले स्वयंपाकघर होते. आई त्यावर बसून स्वयंपाक करत असे आणि आम्ही त्यावरच बसून जेवत असू. आईही वेळेबाबत दक्ष होती. तिलाही पहाटे 4 वाजता उठण्याची सवय होती. पहाटे-पहाटेच बरीचशी कामे ती उरकत असे. गहू, बाजरी दळणे असो नाहीतर तांदूळ-डाळ निवडणे असो, सर्व कामे ती स्वतः करत असे. काम करताना आपल्या आवडीची भजने किंवा भूपाळ्या ती गुणगुणत असे. नरसी मेहता जी यांचे एक प्रसिद्ध भजन आहे, जलकमल छांडी जाने बाला, स्वामी अमारो जागशे हे तिच्या आवडीचे आहे. एक अंगाई गीतही आहे, शिवाजी नु हालरडु…’ आई हे पण बर्‍याच वेळी गुणगुणत असे.

आम्ही भावा-बहिणींनी आपला अभ्यास सोडून तिला मदत करावी अशी तिची अपेक्षाही नव्हती. आपल्या कामात मदत करायला ती कधी सांगत नसे. आई सतत कामात गुंतलेली बघून आम्हा भावा-बहिणींना स्वतःलाच वाटत असे की, तिला कामात मदत करावी. मला तलावात पोहण्याची, तलावात आंघोळ करण्याची फार आवड होती म्हणून घरातले कपडे तलावात धुण्यासाठी मी घेऊन जात असे. कपडेही धुवून होत आणि मला पाण्यात खेळताही येत असे. घर चालवण्यासाठी थोडे आणखी पैसे मिळावेत म्हणून आई दुसर्‍यांच्या घरी भांडीही घासत असे. वेळ काढून चरखाही चालवत असे. कारण, यातूनही थोडी कमाई होत असे. कापसाच्या बोंडातून कापूस काढणे, कापसापासून धागा तयार करण्याचे काम ही सर्व कामे ती स्वतः करत असे. कापसाच्या बोंडाच्या टरफलाचे काटे आम्हाला टोचतील, अशी तिला भीती वाटत असे.

आईला घर सजवण्याची, घर सुंदर ठेवण्याचीदेखील खूप आवड होती. घर स्वच्छ दिसावे याकरिता ती दिवसभर काहीनाकाही करत असे. ती घरातील जमिनी शेणाने सारवत असे. आई एका गोष्टीकडे विशेष लक्ष देत असे, ते म्हणजे अंथरूण अतिशय स्वच्छ आणि टापटीप असावे, त्यावर एक ही धुळीचा कण असलेला तिला खपत नसे. थोड्याशा सुरकुत्या दिसल्या तरी ती पूर्ण चादर झटकून पुन्हा अंथरत असे. आम्हीसुद्धा आईच्या या सवयीचे पालन करत असू. आज इतक्या वर्षांनंतरही आई ज्या घरात राहते, तिथे अंथरुण जरादेखील विस्कटलेले नाही ना याकडे ती बारकाईने लक्ष देते. आईच्या स्वच्छतेविषयीच्या प्रेमाचे इतके किस्से आहेत की, लिहिण्यात खूप वेळ जाईल. आईमध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. जी व्यक्ती स्वच्छतेचे, साफसफाईचे काम करते तिलादेखील आई खूप मान देते. मला आठवतंय, वडनगरमध्ये आमच्या घराजवळील नाल्याची साफसफाई करायला जे येत असत, त्यांना आई चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नसे. पशूपक्ष्यांवर दया करणे हा तिच्या संस्कारांचा भाग आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ती पक्ष्यांकरिता मातीच्या भांड्यामध्ये दाणे आणि पाणी जरूर ठेवत असे. आमच्या घराच्या आजूबाजूला राहणारे रस्त्यावरचे कुत्रे उपाशी राहू नयेत, याचीसुद्धा आई काळजी घ्यायची.

जेवणाच्या बाबतीत आईचा नेहमी एक आग्रह असे की, अन्नाचा एकही कण वाया जाता कामा नये. आमच्या गावी जेव्हा कोणाच्या लग्न समारंभात पंगतीत जेवण असे, तेव्हा जेवताना अन्नाची नासाडी करू नका, असे आई सर्वांना लक्षात आणून देत असे. घरातदेखील आईने हाच नियम केला होता, जितकी भूक असेल, तितकेच अन्न ताटात घ्यावे याकडे तिचा कटाक्ष असे. आई आजसुद्धा जितके खायचे असेल तितकेच पदार्थ ताटात वाढून घेते. आई नेहमीच इतरांना आनंदी बघून स्वतः आनंदी राहते, घरात जागा भले कमी असेल, पण तिचे मन मोठे आहे. आमच्या घराच्या जवळच एक गाव होते, जिथे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे स्नेही राहात असत. त्यांचा मुलगा होता, अब्बास. वडिलांच्या मित्राच्या अकाली निधनानंतर त्यांनी अब्बासला आमच्या घरीच आणले होते. घरातील इतर मुलांप्रमाणेच आई, अब्बासची देखील खूप काळजी घेत असे. ईदच्या दिवशी आई अब्बासकरिता त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. सण उत्सवांच्या काळात जवळपासची काही मुले आमच्या घरी जेवायला येत असत, त्यांना आईच्या हातचे जेवण खूप आवडत असे.

आमच्या घराच्या परिसरात जेव्हा एखादे साधू-महात्मे येत असत, तेव्हा आई त्यांना घरी बोलावून अवश्य खाऊ घालायची. जेव्हा ते निघायचे तेव्हा आई स्वतःकरिता नव्हे, तर आम्हा मुलांकरिता आशीर्वाद मागत असे. ती त्यांना म्हणायची की, माझ्या मुलांना असा आशीर्वाद द्या की, ते दुसर्‍याच्या सुखात स्वतःचे सुख मानतील आणि दुसर्‍याच्या दुःखाने दुःखी होतील. आपल्या मुलांमध्ये भक्ती आणि सेवाभाव जागृत होऊ दे, असा आशीर्वाद ती मागत असे. माझ्या आईचा माझ्यावर गाढ विश्वास आहे. तिला तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. मला अनेक दशकांपूर्वीची एक घटना आठवते. त्याकाळात मी संघटनेत असताना लोकसेवेच्या कामात गुंतलो होतो. कुटुंबीयांशी अजिबात संपर्क नव्हता. याच काळात, एकदा माझा मोठा भाऊ माझ्या आईला बद्रीनाथ, केदारनाथच्या दर्शनासाठी घेऊन गेला होता. आईचे बद्रीनाथाचे दर्शन झाले तेव्हा केदारनाथमधील लोकांनाही माझी आई येत असल्याची बातमी मिळाली. त्याचवेळी अचानक हवामान खूप खराब झाले. हे पाहून काही लोक केदारघाटी उतरून खाली जाऊ लागले. ते आपल्यासोबत काही रजयादेखील घेऊन गेले. ते रस्त्याने दिसणार्‍या वयोवृद्ध महिलांना विचारत होते की, तुम्ही नरेंद्र मोदींच्या आई आहात का? असेच विचारत ते आईला भेटले. त्यांनी आईला रजई दिली, चहा दिला, मग तर ते यात्रेच्या कालावधीत आईसोबतच राहिले. केदारनाथला पोहोचल्यावर त्यांनी आईच्या निवासाची चांगली सोय केली. या घटनेचा आईच्या मनावर मोठा परिणाम झाला. तीर्थयात्रेवरून परतल्यावर माझी आई मला भेटली तेव्हा ती म्हणाली, तू काही चांगलं काम करत आहेस, लोक तुला ओळखतात. आता या घटनेला इतकी वर्षे होऊन गेल्यावर जेव्हा लोक आईच्या जवळ जाऊन तिला विचारतात की, तुमचा मुलगा पंतप्रधान आहे, याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटत असेल, यावर आईचे उत्तर अतिशय सखोल आहे. आई त्यांना सांगते की, जितका तुम्हाला अभिमान वाटतो, तितकाच मलाही वाटतो. तसेही माझे काहीच नाही, मी तर निमित्तमात्र आहे. तो तर देवाचा आहे. तुम्ही हेही पाहिलं असेल की, माझी आई कधीही कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासोबत जात नाही. आत्तापर्यंत दोनदाच ती माझ्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात आली आहे. एकदा, एकता यात्रेनंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून मी परतलो होतो, तेव्हा अहमदाबादमधील नागरी सन्मान कार्यक्रमात माझी आई व्यासपीठावर आली आणि तिने मला कुमकुम तिलक लावला होता. तो क्षण आईसाठी भावनिक होता. कारण, एकता दौर्‍यादरम्यान फगवाडा येथे एक हल्ला झाला होता आणि त्यात काही लोक मारले गेले होते. त्यावेळी आईला माझी फार काळजी वाटत होती. तेव्हा मला दोन जणांचा फोन आला होता. एक फोन अक्षरधाम मंदिराचे अध्यक्ष प्रमुख स्वामीजी यांचा होता आणि दुसरा फोन माझ्या आईचा होता. माझी परिस्थिती जाणून घेऊन आईला हायसे वाटले.

जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी झाला, तेव्हा सार्वजनिक पातळीवर दुसर्‍यांदा माझी आई माझ्यासोबत आली होती. 20 वर्षांपूर्वी झालेला हा शपथविधी म्हणजे माझी आई माझ्यासोबत सार्वजनिकरित्या उपस्थित राहिली आहे, असा शेवटचा समारंभ होता. त्यानंतर ती कधीही एखाद्या कार्यक्रमात माझ्यासोबत आली नाही.

आई तिच्या नागरी कर्तव्यांबाबत नेहमीच  खूप सजग असते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये तिने मतदानाचे कर्तव्य निभावले आहे. काही काळापूर्वी, गांधीनगर  महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीदेखील आई मतदान करायला गेली होती. ती मला अनेक वेळा म्हणते की, हे बघ बाळा, जनतेचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तुझे कधीही काही वाईट होणार नाही. ती सांगते की, स्वतःचे शरीर नेहमी सुदृढ राख, स्वतःला निरोगी ठेव. कारण, शरीर निरोगी असेल तरच तू उत्तम प्रकारे काम देखील करू शकशील. एकेकाळी आई अत्यंत नेमाने चातुर्मासाचे व्रत करत असे. नवरात्रीच्या वेळी माझे नेमनियम काय असतात ते आईला ठाऊक आहेत. पूर्वी ती काही म्हणत नसे, आता मात्र सारखी मला सांगत असते की, नवरात्रीच्या काळात जे कडक व्रत-उपवास करत असतोस, ते आता जरा सोप्या पद्धतीने करू. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आजपर्यंत आईला कोणाची तक्रार करताना ऐकलेले नाही. ती कधी कुणाची तक्रार करत नाही आणि कोणाकडून काहीच अपेक्षादेखील ठेवत नाही.

आजघडीला माझ्या आईच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही. मी तिच्या शरीरावर कधी सोने नाही पाहिले. तिला सोन्या चांदीच्या दागिन्यांचा मोह नाही. ती पूर्वीदेखील साधेपणाने राहायची आणि आजही तशीच तिच्या छोट्याश्या खोलीत अत्यंत साधेपणाने जीवन जगते आहे.

देवावर आईची गाढ श्रद्धा आहे. मात्र, अंधविश्वासापासून ती शेकडो कोस दूरच असते. आमच्या घराला तिने नेहमीच अंधविश्वासाच्या पगड्यापासून दूर ठेवले आहे. ती पूर्वीपासून कबीरपंथाची उपासक आहे आणि त्याच परंपरेला अनुसरून तिची पूजाअर्चा सुरू असते आणि हो, जपमाळ घेऊन जप करण्याची सवय लागली आहे. तिला दिवसभर तिचे भजन गाणे आणि जपमाळ घेऊन नामस्मरण करणे कधीकधी इतके पराकोटीला जाते की ती झोपणेसुद्धा विसरते. घरच्या लोकांना तिची माळ लपवून ठेवावी लागते, तेव्हा कुठे ती झोपायला तयार होते आणि मग तिला झोप लागते. एवढे वय होऊनदेखील आईची स्मरणशक्ती आजही फार उत्तम आहे. अनेक दशकांपूर्वीच्या गोष्टी तिला चांगल्या प्रकारे आठवतात. आजही कोणी नातेवाईक तिला भेटायला जातो तेव्हा ती लगेच त्यांच्या आजी-आजोबांची नावे घेऊन सांगते की, ’अरे, तू त्यांचा नातेवाईक आहेस.’ जगात काय चालले आहे यावर आजही आईचे लक्ष असते. एवढ्यातच मी माझ्या आईला विचारले की, तू हल्ली टीव्ही बघतेस की नाही ? त्यावर आई म्हणाली की, टीव्हीवर जेव्हा बघावे तेव्हा सतत सगळे आपसात भांडत असतात. अर्थात काहीजण असेही आहेत जे शांततेने त्यांचे म्हणणे सांगतात, अशा लोकांचे कार्यक्रम मी बघते. आई इतका विचार करते आहे हे बघून मी आश्चर्यचकित झालो. तिच्या प्रखर स्मरणशक्तीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट मला आठवते आहे. ही 2017 सालची गोष्ट आहे. मी तेव्हा उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या कार्याच्या अखेरच्या काळात काशी येथे राहत होतो. तेथून मी जेव्हा अहमदाबादला गेलो, तेव्हा आईसाठी काशीहून प्रसाद घेऊन गेलो. आईला भेटलो तेव्हा तिने विचारले की, काशिविश्वनाथ महादेवाचे दर्शन तरी घेतलेस का? आई संपूर्ण नावच घेते काशिविश्वनाथ महादेव. मग थोड्या वेळाने तिने विचारले की, काशिविश्वनाथ महादेवाच्या मंदिरापर्यंत जायचा रस्ता अजूनही तसाच आहे का? असे वाटते की, कोणाच्यातरी घरातच हे मंदिर आहे. मी हैराण होऊन तिला विचारले की, तू केव्हा तिथे गेली होतीस? तेव्हा तिने सांगितले की, खूप वर्षांपूर्वी तिचे जाणे झाले होते. अनेक वर्षांपूर्वी केलेल्या तीर्थयात्रेतील गोष्टी तिला तपशीलवार आठवत होत्या. आईकडे जितकी जास्त संवेदनशीलता आहे, सेवावृत्ती आहे तितकीच तिची नजरदेखील खूप पारखी आहे. तिला लहान मुलांच्या छोट्या मोठ्या आजारांवरच्या देशी उपचारपद्धती माहीत आहेत. वडनगरच्या आमच्या घरात तर नेहमीच सकाळपासून लोकांची रांग लागलेली असते. अगदी सहा-आठ महिन्यांच्या लहान बाळांची तपासणी करायला लोक आईकडे घेऊन येतात.

माझ्या दिनचर्येमुळे, माझ्या विविध प्रयोगांमुळे, कधीकधी माझ्या आईला माझ्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत असे. पण, तिच्या कपाळावर कधी आठी पडली नाही, आईला कधीच याचे ओझे वाटले नाही. जसे मी महिनोमहिने मीठाचा त्याग करून अळणी जेवत असे. कधी कधी असे व्हायचे की, आठवडे न आठवडे मी जेवण सोडून फक्त दूध प्यायचो. कधी कधी ठरवायचो, आता सहा महिने गोड पूर्णपणे बंद. हिवाळ्यात मी उघड्यावर झोपायचो, मडक्यातील थंड पाण्याने आंघोळ करायचो. मी स्वतःची परीक्षा घेत होतो. आई मला समजून घेत असे. ती कधीच तिचे म्हणणे लादत नसे. ती हेच म्हणायची, ठीक आहे बाबा, जशी तुझी इच्छा.

आईला कल्पना होती मी वेगळ्या वाटेने जात आहे. मला आठवते, एकदा आमच्या घराजवळच्या गिरी महादेव मंदिरात एक महात्मा आले होते. ते तपश्चर्या करायचे. मी मनापासून त्यांची सेवा करायचो. त्याच दरम्यान माझ्या मावशीचे लग्न होते. घरातील प्रत्येकाला तिथे जायचे होते. मामाच्या घरी जायचे होते. आपल्या बहिणीचे लग्न म्हणून  आईही खूप उत्साहात होती. सगळे आपापल्या तयारीत व्यग्र होते, पण मी आईकडे गेलो आणि सांगितले की, मला मावशीच्या लग्नाला यायचे नाही. आईने कारण विचारल्यावर मी तिला महात्माजींची गोष्ट सांगितली. आईला, मी तिच्या बहिणीच्या लग्नाला येत नसल्याबद्दल वाईट वाटले, पण तिने माझ्या इच्छेचा आदर केला. ती म्हणाली की, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण, तिला काळजी वाटत होती की, मी घरी एकटा कसा राहणार? मला काही त्रास होऊ नये म्हणून तिने चार-पाच दिवस कोरडे अन्न तयार करून घरात ठेवले होते.

जेव्हा मी घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हाही माझ्या आईला ते खूप आधीपासूनच ठाऊक झाले होते. मी बोलता बोलता आई-बाबांना सांगत असे की, बाहेर जाऊन जग काय आहे ते मला पाहावेसे वाटते. मी त्यांना म्हणायचो, रामकृष्ण मिशनच्या मठात मला जायचे आहे. मी त्यांच्याशी स्वामी विवेकानंदांबद्दलही खूप बोलायचो. आई-वडील हे सर्व ऐकत असत. हे असे अनेक दिवस सुरू होते. शेवटी एक दिवस मी माझ्या पालकांना घर सोडण्याची माझी इच्छा सांगितली आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. माझे बोलणे ऐकून माझे वडील खूप दुःखी झाले. ते थोडे खिन्नपणे म्हणाले तू जाणो आणि तुझे काम जाणो. पण, असे आशीर्वाद न घेता घराबाहेर पडणार नाही, असे मी सांगितले. आईला माझ्याबद्दल सगळे माहीत होते. तिने पुन्हा माझ्या मनाचा आदर केला. ती म्हणाली, जे तुझे मन सांगत आहे तेच कर. तिने वडिलांच्या समाधानासाठी सुचवले की, त्यांची इच्छा असल्यास माझी जन्मपत्रिका कोणाला तरी दाखवून घ्यावी. आमच्या एका नातेवाईकाला ज्योतिषविषयक ज्ञान होते. माझी जन्मपत्रिका घेऊन बाबा त्यांना भेटले. कुंडली पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की, त्याचा मार्गच काही वेगळा आहे, जिथे देवाने ठरवले आहे, तिथेच तो जाईल. त्या नंतर काही तासांतच मी घर सोडले. तोपर्यंत माझ्या वडिलांच्या मनाचीही तयारी झाली. वडिलांनी मला आशीर्वाद दिला. घरातून निघण्यापूर्वी आईने मला दही आणि गूळही खायला दिला. आता पुढे माझे जीवन कसे असणार, हे तिला समजले होते. आईने मनाचा कितीही निर्धार केला तरी जेव्हा तिचे मूल घरापासून दूर जाते तेव्हा तिला दुःख होतेच. आईच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, पण त्यात माझ्यासाठी खूप आशीर्वाद होते. घर सोडल्यानंतर, मी जिथे जिथे राहिलो, ज्या परिस्थितीत राहिलो, आईच्या आशीर्वादाची अनुभूती कायम माझ्यासोबत राहिली. माझ्या आईने मला नेहमीच आपल्या तत्त्वांवर ठाम राहण्यासाठी, गरिबांसाठी काम करत राहण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

मला आठवतंय, जेव्हा माझे मुख्यमंत्री होणे निश्चित झाले. तेव्हा मी गुजरातमध्ये नव्हतो. विमानतळावरून मी थेट आईला भेटायला गेलो. आनंदी झालेल्या आईचा पहिला प्रश्न होता, तू आता इथेच राहणार का? आईला माझे उत्तर माहीत होते. मग ती मला म्हणाली मला तुझे सरकारमधील काम समजत नाही. पण तू कधीही लाच घेऊ नयेस हीच माझी इच्छा आहे. इथे दिल्लीत आल्यानंतर आईला भेटणेही कमी झाले आहे. जेव्हा गांधीनगरला जातो तेव्हा कधीकधी आईच्या घरी जाणे होते. आईशी भेट होते, फक्त काही क्षणांसाठी. पण, आजपर्यंत मला माझ्या आईच्या मनात कसलीही नाराजी किंवा दुःख जाणवलेले नाही. आईचे प्रेम पूर्वीसारखेच आहे. आईचे आशीर्वाद पूर्वीसारखेच आहेत. आई नेहमी विचारते दिल्लीत बरे वाटते का? मन रमते ना? ती मला वारंवार आश्वस्त करते की, माझी काळजी करू नकोस, तुझ्यावरची जबाबदारी मोठी आहे. आईशी जेव्हा कधी फोनवर बोलणे होते तेव्हा ती सांगते, हे बघ, कधीही चुकीचे काम करू नको, वाईट काम करू नकोस, गरिबांसाठी काम कर. आज मी माझ्या आई आणि वडिलांच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा जाणवणारी त्यांची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान गरिबीशी संघर्ष करत असताना परिस्थिती कशीही असो, माझ्या पालकांनी कधीही प्रामाणिकपणाचा मार्ग सोडला नाही किंवा त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग त्यांच्याकडे होता. मेहनत, रात्रंदिवस मेहनत.जोपर्यंत वडील हयात होते, तोपर्यंत आपण कोणावरही भार होऊ नये, हे सूत्र त्यांनी पाळले. आजही माझी आई कोणावरही ओझे होऊ नये, यासाठी प्रयत्न करते. जेवढे शक्य असेल तेवढे स्वत:चे काम स्वतःकरावे या प्रयत्नात जगते. आजही जेव्हा मी आईला भेटतो तेव्हा ती नेहमी म्हणते की, मरेपर्यंत माझी कोणाला सेवा करावी लागू नये, चालत्या फिरत्या स्थितीमध्येच जग सोडून जाण्याची माझी इच्छा आहे. माझ्या आईच्या जीवनयात्रेत मला देशाच्या अखिल मातृशक्तीचे तप, त्याग आणि योगदानाचे दर्शन घडते. जेव्हा माझ्या आईच्या आणि तिच्यासारख्या कोट्यवधी महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडते तेव्हा मला जाणवते, भारतातील भगिनी- कन्यांना अशक्य असे काहीच नाही. अभावाच्या प्रत्येक कथेहून मोठी एका आईची गौरवगाथा असते. संघर्षाच्या प्रत्येक क्षणापेक्षा खूप मोठी एका आईची इच्छाशक्ती असते.

आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. तुमच्यासाठी जाहीरपणे इतके लिहिण्याचे, बोलण्याचे धाडस कधी केले नव्हते. आपले आरोग्य उत्तम राहो, आपला आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या चरणी वंदन!

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply