राजेंद्र पाटील यांनी केले जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँक प्रशासनाने कर्ज देताना वडिलांची फसवणूक केली, असा आरोप करण्याबरोबरच कर्नाळा बँक प्रशासनाने केलेल्या या गैरव्यवहारप्रकरणी बँकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. या संदर्भात म्हात्रे यांना आवश्यक असेल तर कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा देण्यासाठी राजकारणविरहित मदत केली जाईल, असे माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची सध्या सहकार विभागाकडून चौकशी सुरू आहे. विवेक पाटील यांच्यासह 20 संचालकांचे खुलासे असमाधानकारक ठरविण्यात आले आहेत. 529 कोटी 36 लाख 55 हजार रुपयांची नियमबाह्य पद्धतीने कर्जे मंजूर करून त्यांचे वितरण करण्यात आल्याचे स्पष्ट म्हटलेले आहे. 20 आजी-माजी संचालकांपैकी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे या बँकेचे उपाध्यक्ष होते. ते हयात नसल्याने त्यांच्या चार वारसांना या प्रकरणात नुकसानीच्या जबाबदारीची रक्कम म्हणून 20 कोटी 87 लाख रुपयांची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये पुंडलिक म्हात्रे यांचे चिरंजीव नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे सहकार विभागाने आरोपपत्र दाखल केल्यानंतर हादरलेल्या अरविंद म्हात्रे यांनी आपल्या वडिलांना विनाकारण अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
वडील खूप आजारी झाल्याने त्यांना 2013 ते 2015 या कालावधीत बँकेच्या बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तरीदेखील ते उपस्थित असल्याचे दाखवून व वडिलांच्या खोट्या सह्या करून बोगस कर्ज घेण्यात आल्याचा आरोप अरविंद म्हात्रे यांनी पनवेल पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. तसे पत्र पोलिसांना देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे, अन्यथा न्यायालयीन लढाई करण्यास तयार असल्याचेही म्हात्रे यांनी नमूद केले आहे.
या संदर्भात बोलताना राजेंद्र पाटील यांनी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी अन्यायाविरोधात उठविलेल्या आवाजाबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल स्वागत केले. माजी आमदार विवेक पाटील शेकापचे नेते असल्याने शेकापच्या अनेक मंडळींचे पैसे बँकेत अडकले असतानाही त्यांना आवाज उठवता येत नव्हता, पण अरविंद म्हात्रे यांनी शेकापचे असतानाही अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे योग्य पाऊल उचलले आहे.
नावडे गावातील शेकापमधील अनेक कार्यकर्त्यांचे कर्नाळा बँकेत खाते आहे आणि त्या अनुषंगाने पैसेही अडकले आहेत, मात्र त्यांचा आवाज दबकून राहिला आहे. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेकापमधील ते पहिली व्यक्ती ठरले आहेत की ज्यांनी न्यायासाठी आता ठाम भूमिका मांडली आहे आणि ती कौतुकास्पद आहे.
सर्वसामान्यांचे पैसे परत मिळावेत ही आग्रही भूमिका घेऊन कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती काम करीत आली आहे. त्यामुळे अरविंद म्हात्रे यांनी न्यायासाठी या समितीची साथ घेतली, तर ही समिती नक्कीच राजकीय चपला बाजूला ठेवून मदत करेल. यासाठी आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर या दोघांचाही पाठिंबा आपण मिळवून देऊ, असे राजेंद्र पाटील यांनी आश्वासित केले आहे.
शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करीत खातेदार, ठेवीदार आणि शेकापला मोठ्या अडचणीत आणले, मात्र तरीही शेकाप व महाविकास आघाडीच्या काही बॅनर्सवर माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो लावून सर्व आलबेल असल्याचे चित्र भासवले जात आहे.
-राजेंद्र पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष