Breaking News

आता करणार साखळीऐवजी आमरण उपोषण

रस्ता दुरुस्तीसाठी कर्जतमधील आंदोलनकर्ते आक्रमक

कर्जत ़: बातमीदार

अनेक वर्षांपासून नादुरूस्त असलेल्या पिंपळोली-गुडवण फाटा या रस्त्याचे तातडीने करावे, या मागणीची तड लावण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकात गुरूवारी (दि. 23) साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र संबंधीत विषयावर कोणताही तोडगा निघत नाही, हे लक्षात घेऊन या आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी दुसर्‍या दिवशीही साखळी उपोषण पुढे सुरू ठेवून, ते आमरण करण्याचे ठरविले आहे. दरम्यान, किशोर शितोळे आणि वामन विरले या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. कर्जत तालुक्यातील गुढवण, आंथ्रट, पिंपळोली, गुढवणवाडी, बोरीवली, पिंगळेवाडी, कालेचीवाडी, तळवडे बुद्रुक, तळवडे खुर्द, भाकरिचपाडा, बोपेले, नेरळ या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा केली आहे. गुढवण – आंथ्रट – पिंपळोली रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्याचे नूतनीकरण करावे या मागणीसाठी बाळू रावजी डायरे, वामन महादू विरले, दशरथ नानू मुने, रमेश शांताराम कदम आणि किशोर नारायण शितोळे यांनी गुरूवारी साखळी उपोषण सुरु केले होते.उपोषणाच्या पहिल्या दिवशी पोलीस अधिकारी अरुण भोर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांची भूमिका समजून घेतली. त्याचवेळी पोलिसांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रल्हाद गोपणे यांना रस्त्याबाबतची मागणी कशी सोडवता येईल, याबाबत विचारणा केली होती. हे उपोषण साखळी असल्याने शासकीय यंत्रणेने त्याकडे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे संतापलेले उपोषणकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी साखळी असलेले उपोषण आमरण कारण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर शासकीय यंत्रणा कामाला लागली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता हे अलिबाग येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात पोहचले आहेत.बांधकाम विभागाने उपोषणकर्त्यांची मागणी असलेल्या रस्त्याची तीन टप्प्यात  सुधारणा करण्याचे मान्य केले आहे. मात्र आपल्याला त्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम  मंजूर केलेले हवे आहे, अशी मागणी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ बाळू डायरे यांनी केली आहे. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी गुरूवारी कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे नेते सुनील गोगटे, दीपक बेहेरे, रमेश मुंढे, पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी, शेकापचे विलास थोरवे, भाकपचे अ‍ॅड. गोपाळ शेळके, माजी सरपंच शंकर भुसारी यांच्यासह अनेकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांना पाठिंबा दिला.

दोघांची प्रकृती बिघडली

गुरूवारपासून उपोषण करणार्‍या बाळू डायरे, वामन विरले, दशरथ मुने, रमेश कदम आणि किशोर शितोळे या पाचजणांपैकी  किशोर शितोळे आणि वामन विरले यांची प्रकृती खालावली असून ते दोघेही उपोषणस्थळी विश्रांती घेत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply