पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिकेच्या होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर अवघ्या 33 हरकती आल्या आहेत. महापालिकेच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा आराखडा 13 जून रोजी जाहीर करण्यात आला. हरकती-सूचनांच्या सुनावणीनंतर प्रभाग रचना अंतिम केल्या जाणार आहेत, अशी माहिती उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली आहे.
पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत 8 जुलै रोजी संपणार आहे. यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती द्यावा लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पनवेल महापालिकेची निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रभाग रचना तयार करून नागरिकांना हरकती आणि सूचना मांडण्याचे जाहीर केले होते. 13 जूनला जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत यंदा 89 नगरसेवक असणार आहेत. 30 प्रभागांत विभागवार करण्यात आलेल्या रचनेत एका प्रभागात तीन नगरसेवक आणि 30 क्रमांकाच्या प्रभागात दोन नगरसेवक अशी रचना केली आहे. पालिकेच्या पहिल्या निवडणुकीवेळी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेपेक्षा यंदा प्रभाग रचना अधिक सुटसुटीत करण्यात आल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच यंदा अवघ्या 33 हरकती, सूचना प्राप्त झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेत तब्बल 150 हरकती सूचना आल्या होत्या, असेही उपायुक्त विठ्ठल डाके यांनी सांगितले.