मुंबई ः प्रतिनिधी
रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. काल सकाळी मार्केटने 900 अंकांनी उसळी घेतली, तर निफ्टीही 200 अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही 69 पैशांनी मजबूत झाला आहे.
लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये रविवारी मतदान पार पडले. मतदान संपल्यावर विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या पोल्सने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. साधारण 287 ते 340 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर झाल्यानंतर काल सकाळी साडेनऊ वाजता शेअर मार्केट सुरू होताच मार्केटने 900 अंकांनी उसळी घेतली. शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक 37,930.77 अंशांवर बंद झाला होता. काल सकाळी 946 अंकांची उचल खात 38,829 अंकांवर पोहचला. शुक्रवारी 11,407.15 अंकांवर बंद झालेला निफ्टी 20 अंकांनी वधारला आहे. एकूण 50 कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत, तर काही कंपन्यांचे शेअर्स घसरलेदेखील आहेत. एक्झिट पोल्समध्ये जरी भाजपला बहुमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी 23 तारखेला वेगळे निकाल जाहीर होऊ शकतात याची गुंतवणूकदारांना कल्पना आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अत्यंत सावधपणे शेअर्समध्ये गुंतवणूक करीत आहेत. आता निकालाच्या दिवशी सेन्सेक्स वधारतो की घसरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.