Breaking News

अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

 पाली पुलावर सलग दुसर्‍या दिवशी आले पाणी; वाहनांच्या लांब रांगा, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल

पाली : प्रतिनिधी

दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून मंगळवारी दुपारी 12 नंतर पाणी गेले होते. ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतर ओसरले होते. मात्र बुधवारी (दि. 13) पावसाचा जोर वाढल्यानंतर दुपारी एक वाजता पुन्हा या पुलावरून नदीचे पाणी गेले. सलग दुसर्‍या दिवशीही पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक खोळंबून  प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी पुलाच्या दोन्ही बाजूस अडकून पडले. तसेच रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

मुसळधार पावसामुळे सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालीतून नागोठणे व सुकेळी येथील शाळेत गेलेले 100 हुन अधिक विद्यार्थी मंगळवारी पुलाच्या पलीकडे 7 ते 9 तास अडकून पडली होती. ती मुले रात्री नऊनंतर पालीला आपल्या घरी पोहचली.  त्यामुळे पालक खूप चिंतातूर झाले होते, असे पालीतील डॉ. मयूर कोठारी यांनी सांगितले. शिवाय खेडेगावातून पालीला शाळेत व महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांनादेखील सलग दुसर्‍या दिवशी अडकून पडावे लागले, असे शिक्षक शरद निकुंभ यांनी सांगितले.

पालीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये,  अशी सूचना तहसीलदार दिलीप रायणावर यांनी दिली आहे.

वाकण-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पुल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. पाली येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने हे प्रवासी व वाहने दोन्ही बाजूस अडकून पडली असून त्यांची गैरसोय झाली.

नवीन पूल अपूर्ण

अंबा नदीवरील पूल जुना अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात येत आहे. मात्र कामातील दिरंगाई व संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे या पुलाचे काम अपूर्ण आहे. या पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते तर प्रवासी व विद्यार्थ्यांचा खोळंबा व गैरसोय झाली नसती.

अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यामुळे पलीकडे खोळंबून रहावे लागते. त्यात अनेक प्रवाशांचे हाल होतात. प्रवासी व वाहने अडकून पडतात. विद्यार्थी व चाकरमान्यांना सर्वाधिक फटका बसतो.

-संतोष भोईर, शिक्षक, पाली, ता. सुधागड

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply