बदली धोरण प्रक्रिया : दुसर्या तालुक्यात अतिदुर्गम शाळेत काम करण्याची नामुष्की
मुरुड : प्रतिनिधी
2022 या शैक्षणिक वर्षातील शिक्षकांच्या बदल्या तब्बल एक वर्ष विलंबाने 2023च्या शैक्षणिक वर्षात होत आहेत. त्यामुळे 53 वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या कित्येक शिक्षकांना या वयात आपला तालुका सोडून दुसर्या तालुक्यात अतिदुर्गम शाळेत काम करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामध्ये महिला शिक्षक तसेच कित्येक शिक्षक हे जिल्हा परिषद शिक्षक पतीपत्नी असूनही एकत्रीकरणाचा कोणताही विचार न करता या वयात कौटुंबिक विस्कळीतपणाचे कारण ठरत आहेत. पन्नास वर्षांच्या उंबरठ्यावर किंबहुना नवीन शाळेवर हजर होताना यापैकी बर्याच शिक्षकांना वयाची 53 वर्षे पूर्ण होत असूनही बदली धोरणामुळे या वयात त्यांना अतिदुर्गम आणि दूरवरच्या तालुक्यात काम करावे लागणार आहे. यांमध्ये महिला शिक्षक जर पन्नाशीच्या पुढच्या गृहीत धरल्या तर त्यांचे पती सेवानिवृत्त किंवा निवृत्तीकडे झुकलेले असून या सेवेच्या अंतिम टप्प्यात त्यांना कुटुंबापासून दूर राहण्यास लागणे हे बदली धोरण कारण ठरत आहे. याच वयादरम्यान व्यक्तीला विविध शारीरिक आजार, आईवडिलांची सेवा, कौटुंबिक जबाबदार्या या आणि अशा विविध बाबींचा विचार करुन होमब्लॉक मिळणे क्रमप्राप्त ठरते. विशेषतः स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनोळखी अतिदुर्गम ठिकाणी नेमणूक देताना स्त्रियांना प्राधान्याने वगळणे आवश्यक आहे. दरम्यान यापैकी बर्याच शिक्षकांनी आपली सुरुवातीच्या काळातील सेवा अतिशय दुर्गम भागात केली असूनही, तत्कालीन परिस्थितीचा विचार न करता सद्यस्थितीतील मोघम निरीक्षण करून, कोणतेही ठोस निकष न लावता या शाळा सुगम किंवा दुर्गम घोषित करण्यात आल्या आहेत. या बाबीचाही फटका बदली धोरण राबवताना या शिक्षकांना बसला आहे. खरंतर या बदली प्रक्रियेतील त्रुटी शासनाच्या लक्षात आल्या असून त्यांची दुरुस्ती ही पुढील वर्षीच्या बदली प्रक्रियेत राबविण्यात येणार असल्याचे कळते. मात्र आता होऊ घातलेल्या बदली प्रक्रियेतील शिक्षकांना लाभ व्हावा, अशी बदली झालेल्या सर्वच शिक्षकांची मागणी आहे.
सहानुभूतीने विचार व्हावा
या बाबींचा सहानुभूतीने विचार करुन, पन्नाशीच्या पुढील शिक्षकांना, स्त्रियांना, पती- पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असणार्या शिक्षकांना हृदयविकारासारखा आजार असणार्या शिक्षकांना 2022च्या सहाव्या टप्प्याच्या बदली प्रक्रियेतून तात्काळ वगळावे.
न्यायालयात मागणार दाद
यावेळी अन्यायकारक बदल्या झाल्यास दीर्घ मुदतीच्या रजेवर जाण्याची तयारी ठेवण्याचे सूतोवाचही या शिक्षकांनी करुन आपल्या तीव्र भावना आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केल्या आहेत. लवकरच काही शिक्षक न्यायालयात दाद मागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त मिळत आहे.