Breaking News

पनवेलमधील 7 ते 11च्या गर्दीवर पोलिसांचा वॉच

विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा

पनवेल : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. असे असले तरीदेखील 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत पनवेल परिसरात 7 ते 11 या दरम्यान वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून येत आहे. हे ध्यानात येताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी आता रस्त्यावर उतरले असून ये-जा करणार्‍या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी व तपासणी करण्यात येत आहे व विनाकारण फिरणार्‍या वाहन चालकांवर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आलेले आहे. असे असतानाही अत्यावश्यक सेवा वगळून अनेक दुकाने छुप्या मार्गाने सुरू असतात. त्यामुळे पनवेल परिसरातील नागरिक खरेदीसाठी शहरात येतात. त्यातूनच वाहनांची वर्दळ वाढते. हे सर्व टाळण्यासाठी व कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी ही गर्दी थांबविणे गरजेचे आहे. यासाठी पनवेल शहर पोलिसांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने आता कंबर कसली असून शिवाजी चौक, टपाल नाका, उरण नाका, ठाणा नाका, आंबेडकर रोड, जयभारत नाका, पंचमुखी मारुती मंदिर, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅण्ड, तक्का आदी भागामध्ये पोलिसांची पथके ठिकठिकाणी फिरत असून कित्येक ठिकाणी नाका बंदी सुद्धा करण्यात येत आहे.

विना मास्क फिरणे, वाहन चालविणे किंवा विनाकारण फिरणे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, तसेच अत्यावश्यक सेवेकरींना यातून वगळण्यात आले आहे. आवश्यक ती माहिती दिल्यावर तसेच ओळखपत्र दाखविल्यावर अशा वाहन चालकांना पोलीस सोडत आहेत. तरी वाहन चालकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात येत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply