अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण तसेच पाणी व स्वच्छता विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छता माहिती केंद्रांची निर्मिती हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच शाळांमध्ये विविध सुविधा निर्माण करुन देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे न वाटता शिकण्यासाठी स्वयंप्रेरित करणे हा यामागील उद्देश आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वच्छता माहिती केंद्राची निर्मिती हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, माध्यमिक शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
कार्यशाळा संपन्न
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण तसेच पाणी व स्वच्छता मिशन यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छता केंद्रांची निर्मिती या अभिनव उपक्रमाची माहिती देण्याकरिता गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्याकरिता पाणी व स्वच्छता विभागामार्फत गुरुवारी (दि. 21) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महिला बचतगट, शिक्षक व विद्यार्थी हे तीन घटक एकत्र येऊन काम करतील तेव्हा सामाजिक क्रांती निर्माण होईल. या तीन घटकांमार्फत प्रत्येक घरापर्यंत पोहचणे सहज शक्य असून, स्वच्छतेची चळवळ निर्माण होईल. तसेच सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय अंगिकारली पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मांडले.
यावेळी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, सागरमित्र संस्थेचे विनोद बोधणकर, युनिसेफ प्रतिनिधी जयंत देशपांडे उपस्थित होते.
शाळांनी राबविण्याचे उपक्रम
दहा विद्यार्थी, एक शिक्षक यांना स्वच्छता प्रशिक्षण, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, दिव्यांगस्नेही स्वच्छतागृह निर्मिती, इन्सीनेटर मशीन बसविणे, हॅडवॉश स्टेशन, परसबाग, स्वच्छतागृहात नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा, परसबागा, शोषखड्ड्यांची निर्मिती, प्लास्टिक संकलन केंद्र व कचराकुंडीची व्यवस्था, किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान विश्रांतीसाठी रेस्टरुम, सॅनिटरी पॅड, वाचनीय पुस्तकांची उपलब्धता, भिंतीवर सचित्र स्वच्छता संदेश, सॅनिटेशन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा निर्मिती, वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्कची निर्मिती.