नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च
न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जनतेने शांती व एकतेचे दर्शन घडवले, असे म्हणत मोदींनी सर्वांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा 59वा भाग रविवारी (दि. 24) प्रसारित झाला. या कार्यक्रमात त्यांनी
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली. अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. तेथील वादग्रस्त जागेवर राम मंदिर होईल, तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयावर मोदी यांनी भाष्य केले.
9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येप्रकरणी निर्णय दिला. या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, असे म्हटले जात होते, परंतु 130 कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, देशाच्या हितापेक्षा मोठे काहीच नाही. देशात शांती, एकता आणि सद्भावना कायम ठेवल्याबद्दल धन्यवाद, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचबरोबर त्यांनी महिलांसाठी नव्याने सुरू केलेल्या भारत की लक्ष्मी या योजनेबाबत माहिती दिली. या योजनेमुळे महिलांचा विकास होईल, तसेच देशातील महिला सक्षमीकरणास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.