Breaking News

आजपासून मासेमारीला सुरुवात; मच्छीमारांची लगबग

उरण : रामप्रहर वृत्त

पावसाळी हंगामात मासेमारीवर शासनाने घातलेली दोन महिन्यांची बंदी सोमवार (दि. 1 ऑगस्ट)पासून उठत असल्याने मच्छीमारांची मासेमारीसाठीची लगबग सुरू आहे. उरणच्या करंजा व मोरासह इतर बंदरातील खलाशी आणि मच्छीमार यासाठी तयारीला लागले आहेत. बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छीमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत मत्स्य खवय्यांसाठी भरपूर ताजे आणि स्वस्त मासे उपलब्ध होणार आहेत.

जून व जुलै महिने हा दोन माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा काळ असतो. तसेच हा पावसाळा ऋतू असल्याने समुद्र खवळलेला असल्यामुळे 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छीमार बांधवदेखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्यांच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. या बंदीच्या दोन महिन्यांत त्यांनी ही आपली कामे पूर्ण केली असून आत्ता मोठ्या आनंदात, गाणी गात आपल्या होड्या घेऊन सातासमुद्रापलीकडे मच्छीमारी करता जाणार आहेत.

जिवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजीविका करणार्‍या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. 15 लाखांच्यावर कुटुंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठे परकीय चलन मिळते. एकट्या महाराष्ट्रात सुमारे चार लाख 68 हजार मेट्रिक टन मासळी पकडली जाते.

उरण तालुक्यातदेखील मच्छीमारांची संख्या लक्षणीय आहे. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक मच्छीमार खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करतात. देशाच्या विकासाला महत्त्वाचा हातभार लावणारा दर्याच्या राजा हा नेहमी उपेक्षितांचे जिणे जगत असतो. कोळी बांधवांसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो. परदेशातील आणि परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण हा आत्ता महाराष्ट्राच्या मच्छीमारांसाठी मोठी समस्या झाली आहे.

नव्या हंगामासाठी बोटी सज्ज

करंजा, मोरा, दिघोडा किनार्‍यावर दोन महिने शाकारून ठेवलेल्या बोटी मासेमारीच्या नव्या हंगामासाठी तयारीला लागल्या आहेत. दोन महिने बोटी बंद राहत असल्याने बोटीवरील जाळी, ती ओढण्यासाठी असलेली यंत्रे बोटीची सफाई करण्यास वेळ लागत असल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply