962 ई-वाहनांची नोंदणी; अलिबाग तालुक्यात सर्वाधिक मागणी
नागोठणे : राज वैशंपायन
रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढली असून, गेल्या वर्षभरात तब्बल 962 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर शेकडो ई-वाहने प्रतीक्षा यादीमध्ये असल्याचे शोरूम मालक सांगतात. इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. पर्यावरणपूरक वाहन असल्याने ग्राहकही ई-वाहनास पसंती देत आहेत. ई-वाहनांना केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यातदेखील ई-वाहनांना चांगली मागणी आहे. दक्षिण रायगडमध्ये ई-वाहनांची मागणी सर्वाधिक आहे. पेण परिवहन कार्यालया अंतर्गत येणार्या रोहा, पेण, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर, सुधागड, कर्जत, मुरूड या तालुक्यातील लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वाहनांना पसंती दिल्याचे दिसत आहे. ई-वाहने बॅटरीवर चालतात. ही बॅटरी घरातील विजेवर चार्जिंग करता येते. त्यामुळे इंधनाचा खर्चात 25 टक्के बचत होतेे. त्यामुळे ई-वाहनांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर शहरी भागात मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. आता ग्रामीण भागातील नागरिकांचाही ई-वाहनाकडे कल वाढत असल्याचे दिसून येते.
रायगडात नोंदणी झालेली ई-वाहने
कार : 55,
दुचाकी : 899,
प्रवासी रिक्षा : 3
मालवाहू रिक्षा : 5
येणार्या काळामध्ये डिझेल, पेट्रोलची कमतरता वाढत जाणार आहे. या गोष्टींचा विचार करून शासनाने इलेक्ट्रॉनिकल वाहनांचे धोरण आखले आहे. ते पर्यावरणपूरकही आहे. आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. त्यामुळे ग्राहकांनीदेखील पसंती दिली आहे. येणार्या काळात पुरेशा प्रमाणात चार्जिंग स्टेशन उभे केल्यास ई-वाहनांना ग्राहकांकडून फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.
-अभय देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल
गेल्या सहा महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक वाहन चालवत आहे. अद्याप कुठल्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही. मला दररोज सात किमी प्रवास करावा लागतो. माझे दररोज दीडशे ते दोनशे रुपयांची बचत होत असून वेळही वाचत आहे.
-भास्कर शिंदे, पोलीस कर्मचारी, नागोठणे