Breaking News

असंवेदनशीलतेचे आव्हान

गोंदिया बलात्कार प्रकरणाने वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर हेडलाइनची जागा पटकावली असली तरी अशा घटना या अलीकडे समाजाकडून मात्र एक प्रकारच्या निर्विकारपणेच स्वीकारल्या जाताना दिसतात. अमानुष लैंगिक अत्याचाराची अशी एखादी घटना कुठे आणि कुणाच्या संदर्भात घडली आहे यावरून जनसामान्यांची प्रतिक्रिया किती तीव्र असेल ते ठरते. अन्यथा काही राजकीय पक्षांकडून निव्वळ राजकारणात भांडवल करण्याचा एक मुद्दा म्हणूनच अशा दुर्दैवी घटनांचा वापर होताना दिसतो. गोंदिया बलात्कार प्रकरणातील अवघा घटनाक्रम यापूर्वी आपल्या देशात ग्रामीण अथवा दुर्गम भागात कित्येक ठिकाणी घडून गेलेल्या व अधूनमधून कानावर येणार्‍या कुठल्याही बलात्कार प्रकरणासारखाच आहे. घरगुती वादातून गोंदिया जिल्ह्यातील ही महिला अवेळी एकटीच माहेरी जाण्यासाठी घराबाहेर पडली आणि अमानुष अत्याचारांची मालिकाच दुर्दैवाने तिच्या नशिबी आली असे आता उघड होत चाललेल्या माहितीतून समोर येते आहे. एरव्ही सर्वसामान्य म्हणून वावरणार्‍या काही पुरुषांमधला नराधम एकटीदुकटी असहाय्य स्त्री दिसली की कसा जागा होतो ते याही प्रकरणातून पुरते स्पष्ट दिसते. आपल्याकडचे बहुसंख्य बलात्कार हे ओळखीच्याच पुरुषांकडून केले जातात हे वास्तव याही प्रकरणात अधोरेखित होते. माहेरी सोडण्याची भूलथाप देऊन ओळखीच्याच एका इसमाने तिला भलत्याच गावी नेऊन तिच्यावर सर्वप्रथम अत्याचार केले. त्याने तिला जीवे मारण्याची अमानुषता थेट दाखवली नसली, तरी तिला जंगलात एकटे सोडून जाण्यामागे हेतू मात्र तोच असावा. अत्याचाराने सुन्न झालेली ही महिला जंगलातून वाट काढून कशीबशी मुख्य रस्त्यावर पोहोचली आणि कुणा महिला पोलिसाने तिला एकटेच हिंडताना पाहून ती सुरक्षित पोलिस ठाण्यात पोहोचेल याची खबरदारीही घेतली. पण त्या महिला पोलिसाने दाखवलेली संवेदनशीलता ही विरळाच ठरली. पीडितेच्या नशिबीचा दुर्दैवाचा फेरा त्यानंतरही थांबला नाही. आपल्या देशातील बहुतांश बलात्कार प्रकरणांमध्ये ठळकपणे सामोरी येणारी पोलिसांची पीडित महिलेविषयीची नेहमीची कमालीची असंवेदनशीलता त्यानंतर मात्र तिच्याही वाट्याला आली. लाखनी पोलीस ठाण्यातून ही महिला स्वत:च निघून गेल्याचा दावा तेथील पोलिसांकडून आता केला जातो आहे. अत्याचारामुळे बधिरावस्थेत असलेल्या या निराधार महिलेची नीट विचारपूस करण्याची दक्षता या पोलिसांनी न घेतल्यामुळेच ती पुन्हा एकदा नराधमांच्या तावडीत सापडली. तिच्यावर आणखी दोघांनी त्यानंतर बलात्कार केल्याची माहिती आता समोर आली आहे. संबंधित पीडिता पोलिसांची नजर चुकवून पोलिस ठाण्यातून निघून गेल्याचा दावा पोलीस आता करीत असले तरी त्यातून त्यांची बेफिकीरीच उघड होते. सलग दोन दिवस अत्याचारांचा सामना केलेल्या या महिलेची प्रकृती आता गंभीर असल्याने राजकीय लाभापोटी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा अवघा घटनाक्रम महिलांसाठी असुरक्षित मानल्या जाणार्‍या उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये असंख्य बलात्कार प्रकरणांमध्ये असतो तसाच आहे. पण याखेपेला हे दुर्दैवी प्रकरण महाराष्ट्रात घडले आहे. यानिमित्ताने नेहमीचेच, आणखी किती निर्भया वगैरे प्रश्न विचारले जातील. राजकीय पोळी भाजून घेण्याकरिता याही प्रकरणाचा वापर होईल आणि कालांतराने हेही प्रकरण निव्वळ गुन्हेगारीच्या वार्षिक आकडेवारीत जमा होईल. दुर्गम, ग्रामीण भागातील असहाय्य, पीडित महिलांना रात्रीच्या वेळी पोलिसांनी कशाप्रकारे सुरक्षितता पुरवावी याचे स्पष्ट निर्देश यानिमित्ताने किमान पुन्हा अधोरेखित व्हावेत. त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता पोलिसांना पुरेसे संवेदनशील करण्याचे आव्हान मात्र खूपच मोठे आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply