Breaking News

अजेंडा मणिशंकर…

लोकसभा निवडणूक संपत आलेली आहे. सहाव्या ़फेरीचे मतदान आज रविवारी होत आहे आणि पुढल्या रविवारी शेवटच्या सातव्या ़फेरीचे मतदान व्हायचे आहे. पण अजून कुठे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता मणिशंकर अय्यर यांचा आवाज नाही, म्हणून अनेकजण कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. कारण भाजपाच्या अनेक स्टार प्रचारकांपैकी मणिशंकर अय्यर एक मोठे नाव आहे. त्यांच्या एका शब्दाने किंवा विधानाने निवडणूकीच्या गदारोळामध्ये जान आणली जाते, असा इतिहास आहे. सहाजिकच अजून मणिशंकर अय्यर का बोलले नाहीत, किंवा त्यांनी लोकसभेच्या प्रचारकाळात असे मौन कशाला धारण करावे, याची अनेकांना फ़िकीर आहे. त्याचे खरे उत्तर राहुल गांधी असे आहे. जो अजेंडा घेऊन मणिशंकर अय्यर मागल्या कित्येक वर्षात कॉग्रेसमध्ये कार्यरत होते, तोच अजेंडा अखेरीस पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधींनी स्विकारला असेल, तर अय्यर यांना काम काय शिल्लक उरणार ना? बहुतेकांना अय्यर यांचा पुर्वेतिहास नेमका किंवा तपशीलात ठाऊक नाही. म्हणून मग असल्या शंका घेतल्या जातात. सव्वा तीन वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा तामिळनाडू, बंगाल अशा काही विधानसभेच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्या निकालावर प्रतिक्रीया देताना अय्यर कमालीचे उत्साहित झालेले होते. त्यापैकी कुठल्याही निवडणूकीत कॉग्रेसला यश मिळालेले नव्हते आणि झाले तर नुकसानच झालेले होते. त्यावर प्रतिक्रीया देताना अय्यर म्हणाले होते, कॉग्रेसने जिंकण्याचा वा यश मिळवण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपा पराभूत होणे हाच अजेंडा असला पाहिजे. बंगाल व तामिळनाडू अशा दोन प्रमुख राज्यात भाजपाला काडीमात्र यश मिळालेले नाही, हीच आनंदाची बाब आहे. तो अर्थात तेव्हा कॉग्रेसचा अजेंडा नव्हता. पण राहुल गांधींनी अध्यक्षपद हाती घेतल्यापासून तो अजेंडा म्हणून स्विकारला आणि स्वत:कडे मणिशंकर अय्यर यांची भूमिका घेतली आहे. मग अय्यर यांना बोलायला शिल्लक काय उरले?

1998 सालात तात्कालीन कॉग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी विनाअट जयललितांशी आघाडी केली नाही आणि त्या भाजपाच्या गोटात सहभागी झाल्या. तेव्हा अय्यर खुप संतापले होते आणि त्यांनी कॉग्रेसला रामराम ठोकला होता. योगायोग असा, की तेव्हाच मार्क्सवादी पक्षाशी कॉग्रेस दोन हात करीत नाही, म्हणून बंगालच्या ममता दिदीही संतापलेल्या होत्या. त्यांनी कॉग्रेस सोडली व तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून तृणमूल कॉग्रेसची स्थापना केली. त्यांच्या व्यासपीठावर अय्यर जाऊन धडकले होते. तेव्हा त्यांनी ममताचे कौतुक केले होते. पण त्यांना तोंडघशी पडावे लागले. कारण लौकरच आलेल्या लोकसभा निवडणूकीत ममताच भाजपाच्या गोटात दाखल झाल्या आणि अय्यर यांचा तीळपापड झाला होता. त्यांनी पुन्हा कधी ममताचे तोंड बघितले नाही. एकूण काय, तर कॉग्रेस किंवा आपल्या व्यक्तीगत यशाशी कर्तव्य नसलेला आणि भाजपा संघाच्या द्वेषातच आपले जीवन बघणार्या माणसाला मणिशंकर अय्यर म्हणतात. हा आरंभीच्या काळात त्यांचा व्यक्तीगत अजेंडा होता. कॉग्रेस तसे मानत नव्हती. म्हणून तर तशा विधानांवर राहुलनीही आक्षेप घेऊन मणिशंकरना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अय्यर मोदींना चायवाला म्हणाले व मोदींनी गेल्या लोकसभा प्रचारात त्याचा खुप फ़ायदा घेतला. गेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीच्या ऐन मतदान काळात अय्यर यांनी मोदींना नीच वृत्तीचा माणूस अशी शेलकी शिवीगाळ केली आणि मोदींना त्याचा लाभ मिळाला. अनेकांना यात मुर्खपणा वाटतो, कारण त्यातून कॉग्रेस पक्षाचे राजकीय नुकसान झाले, मतेही कमी झाली. पण अय्यरना कुठला फ़रक पडतो? त्यांना कॉग्रेसच्या यशापयशाशी काहीही कर्तव्य नाही व नव्हते. संघ भाजपाची निंदानालस्ती हा त्यांचा अजेंडा होता आणि तो राबवताना कॉग्रेस रसातळाला गेली तरी अय्यरना फ़रक पडत नव्हता. आज राहुलचा अजेंडा किती वेगळा आहे?

कुठलाही राजकीय पक्ष निवडणूकीच्या आखाड्यात उतरतो, तेव्हा त्याला कमीअधिक प्रमाणात सत्ता संपादन करायची आकांक्षा असते. सत्तेचा किंवा जिंकण्याचा उद्देश नसेल तर कोणी या आखाड्यात उडी घेत नाही. काही प्रसंगी व्यक्ती वा संघटना अशा आखाड्यात उडी घेतात, ते भलत्याच कुणा राजकीय पक्षाचे हस्तक वा दलाल म्हणून उतरलेले असतात. किंवा एखाद्या पक्षाचा पराभव बघण्याच्या हेतूने त्यांना प्रेरीत केलेले असते. उदहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच लोकसभा निवडणूकीत मोदी-शहांना पराभूत करण्यासाठी उतरलेली होती. पण ज्यांना त्याचा लाभ व्हावा अशी त्या पक्षाची अपेक्षा आहे, त्या कॉग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षालाही मोदी-शहांना पराभूत करायचे असले तरी आपल्याला यश मिळावे अशीही अपेक्षा नक्कीच आहे. म्हणून तर राज ठाकरे या नावामुळे उत्तर भारतातील मते जाण्याचा धोका ओळखून त्या पक्षाने मनसेला आपल्या आघाडीत घेण्यास साफ़ नकार दिला. पण जे पक्षाचे धोरण आहे, तोच पक्षाध्यक्ष राहुल गांधींचा अजेंडा आहे काय? मागल्या वर्षभरात तरी त्यांनी त्याची कधीच साक्ष दिलेली नाही. एकूण राहुल गांधींचे वागणे बोलणे यातून त्यांना पक्षाच्या यशापेक्षाही मोदींना बदनाम करण्यात अधिक स्वारस्य दिसते. मग त्यासाठी स्वपक्षाचे नुकसान झाले तरी राहुल बेफ़िकीर असतात. तेच तर मणिशंकर अय्यर सांगत व करत आले नव्हते का? कॉग्रेस पक्षाचे नुकासान राहुल गांधींनी जितके केलेले आहे, तितके मोदी वा अन्य कुणा विरोधकाने केलेले नाही. मात्र असे करताना स्वपक्षाचे नुकसान झाले तरी राहुल खुश असतात. तेव्हा त्यांच्यात वसलेला मणिशंकर अय्यर लपून रहात नाही. त्यातून प्रत्यक्षात भाजपा किंवा मोदींचे नुकसान होताना दिसत नाही. पण कॉग्रेसचे नुकसान मात्र खात्रीपुर्वक होताना दिसलेले आहे. म्ह्णूनच त्याला मणिशंकर अय्यर यांचा अजेंडा म्हणावे लागते.

वर्षभरापुर्वी उत्तरप्रदेशात पोटनिवडणूकांमध्ये भाजपाच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला तेव्हा सर्वाधिक खुश होते, राहुल गांधी! जसे अय्यर बंगाल व तामिळनाडूत भाजपाच्या पराभवाने सुखावले होते, तशीच काहीशी राहुलची अवस्था होती. पण मुद्दा असा होता, की बंगाल व तामिळनाडूत तेव्हा भाजपाचे स्थानच नगण्य होते. मग पराभव म्हणजे काय असतो? पण त्याच दोन्ही राज्यात पुर्वापार चालत आलेली कॉग्रेसची शक्ती अधिकच खच्ची झाली होती आणि तरीही अय्यर सुखावले होते. तेच आज राहुलच्या बाबतीत होताना दिसते आहे. 2004 च्या पुनरावृत्तीची भाषा प्रत्येक कॉग्रेसवाला अगत्याने बोलतो. पण तेव्हा पक्षाला सावरण्यासाठी व अधिक जागा जिंकण्यासाठी सोनियांनी आपल्याशी खटकून वागणार्या मायावती, शरद पवार किंवा रामविलास पासवान यांच्या पायर्या झिजवण्याचे कष्ट घेतले होते. आपला अहंकार दाखवून त्यांच्याकडे पाठ फ़िरवलेली नव्हती. गेल्या काही महिन्यात मायावती, अखिलेश, चंद्राबाबू, केजरीवाल किंवा बंगालमध्ये डाव्या आघाडीने राहुल गांधींना सोबत घेण्यासाठी खुप प्रयत्न केले. तरी राहुलनी त्यांच्याकडे वळूनही बघितले नाही. विविध राज्यात किरकोळ आघाड्याही प्रतिपक्षाला मोठा दणका देऊ शकतात आणि मोठे यश आपल्याकडे घेऊ शकतात. पण या वास्तवाकडे काणाडोळा करून राहुलनी फ़क्त मोदींच्या बदनामीची मोहिम चालवली आणि त्याचा मोदींना तोटा होण्यापेक्षा लाभ होताना दिसत आहे. पण राहुल यांचा चेहरा व देहबोली बघितल्यास ते कमालीचे समाधानी आहेत. जागा किती मिळतील वा पक्षाचे नुकसान किती होईल, त्याची चिंता त्यांच्या चेहर्यावर कुठेही दिसत नाही. आपल्या शिव्याशापांनी मोदी व भाजपावाले विचलीत होतात, यावरच राहुल फ़िदा आहेत. त्या अर्थाने बघितले तर राहुल व राज ठाकरे यांच्यात काडीमात्र फ़रक नाही. पण राज ठाकरें उमेदवार मैदानात नाहीत, हाही फ़रक मोलाचा आहे. त्यांना निकालाने फ़रक पडणार नाही, राहुलना पडणार आहे.

लोकशाहीत निवडणूका जिंकण्यासाठी लढवायच्या असतात. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कसरती करायच्या नसतात, हे निदान उमेदवार मैदानात आणणार्यांनी लक्षात ठेवायला हवे. त्याचा मागमूस राहुलच्या वागण्यात बोलण्यात दिसून येत नाही. मणिशंकर अय्यर यांना जसे भाजपावाले किंवा मोदी समर्थकांना डिवचण्याने सुख मिळायचे, तशीच काहीशी मानसिकता आता राहुलमध्ये आढळून येऊ लागली आहे. मणिशंकर अय्यर पक्षाध्यक्ष नव्हते आणि राहुल पक्षाध्यक्ष आहेत. अय्यर यांच्यावर पक्षाच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी नव्हती, राहुलवर आहे. म्हणून दोघांच्या अजेंडामध्ये फ़रक असावा लागतो. कॉग्रेसच्या दुर्दैवाने त्याचे राहुलना भान उरलेले नाही, की त्यांनीच भरती केलेल्या तोंडाळ नेते प्रवक्त्यांना त्याची जाणिव नाही. आपापल्या अस्तित्वाची लढाई करणार्या प्रादेशिक व पुरोगामी पक्षांच्या भावनात्मक अगतिकतेचा लाभ उठवता येण्यापर्यंत असे चालू शकते. पण त्याचा कडेलोट होईल तेव्हा त्याही पक्षांना आपले मतलब शोधून पुरोगामीत्वाचे नाटक थांबवावे लागणार आहे. पासवान किंवा नितीशकुमार तो धडा लौकर शिकले आणि 23 मे नंतरच्या राजकारणात इतरही पुरोगामी पक्ष तोच धडा हळुहळू शिकणार आहेत. त्यानंतर मग कॉग्रेसला त्या पुरोगामीत्वाच्या कुबड्याही उभ्या करू शकणार नाहीत. कारण अय्यर यांच्यासारखे उपटसुंभ जनतेपासून खुप दुर असतात आणि त्यांच्या बुद्धीमत्तेवर लोकमत खेळवता येत नसते. हे जाणलेले असल्यानेच नरेंद्र मोदी जनमानसावर राज्य करू शकत आहेत आणि त्यांचे विरोधक अय्यर यांच्यासारख्या पुस्तकपंडितांच्या आहारी गेल्याने जमिनदोस्त होत गेलेले आहेत. इथे तर राहुलनी आपला सगळा शतायुषी पक्षच मणिशंकर अय्यर यांच्या चरणी अर्पण केला असेल, तर कॉग्रेस पक्षाला कुठले भवितव्य असेल?

-भाऊ तोरसेकर, मो. क्र. 9702134624

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply