Breaking News

मुरूड, रोह्यात भातपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यात 3900 हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच सध्या कडक ऊन पडत असल्याने मुरूड तालुक्यातील भातपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, भातपिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी मुरूड तालुक्यात 2800 मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र यंदा जेमतेम 1262 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे कडक उन पडत असल्याने भातपिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रसार झाल्याचे दिसून येत आहे.

मुुरूड तालुक्यात भातपिकावर खोड कीड व कडा करपा रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृषी खात्याच्या कर्मचार्‍यांनी तालुक्यातील भातपिकाची पहाणी करून रोग निवारणासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन आणि औषधांचा पुरवठा करण्याची आवश्यक आहे. लवकर उपाययोजना केली नाही तर शेतीचे मोठे नुकसान होईल,

-श्रीधर जंजीरकर, उपाध्यक्ष, किसान क्रांती संघ 

 

रोहा : रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी सुरळीतील अळी व निळे भ्ाुंगेरे, खोडकिडा यांचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरूवात झाली आहे. शेतकर्‍यांनी वेळीच कीडनिहाय व्यवस्थापनाच्या उपाययोजना करून आपल्या भातपिकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन किल्ला-रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रा मार्फत करण्यात आले आहे. सुरळीतील अळीमुळे 2 नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रति चुड आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी शेतात पाणी बांधून ठेवावे आणि 20 मि.ली. रॉकेल पाण्यात सोडावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. ज्यामुळे सुरळ्या पाण्यात पडून आणि गुदमरून मरतात. शेतातील पाणी बाहेर काढत असताना एका बाजूला बांध पाडून त्या ठिकाणी मच्छरदाणीची जाळी लावून सुरळ्या एकत्र करून माराव्यात. या शिवाय गरज असल्यास व आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव असल्यास फेनथेएड 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. 10 ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. निळ्या भ्ाुंगेर्‍यांचा प्रादुर्भाव भात खाचरामधील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा जागेवर होतो. त्यामुळे अशा सखल भागांची शेतकरी बांधवांनी वेळोवेळी पहाणी करावी. पुनर्लागवडीच्या वेळेस 1 निळा भ्ाुंगेरा किंवा 1 प्रादुर्भित पान प्रतिचुड आढळून आल्यास या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे, असे समजावे. या किडीच्या व्यवस्थापनाकरीता भात खाचरात पाणी जास्तकाळ न साठता निचरा होईल, याची काळजी घ्यावी. भात लावणीनंतर बांध तणविरहित ठेवावेत. प्रादुर्भाव दिसून येताच त्वरीत क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 25 मि.लि. किंवा लॅमडासायहेलोथ्रिन पाच टक्के प्रवाही सहा मि.लि. प्रती 10 लिटर पाण्यामधून फवारणी करावी. अधिक माहितीसाठी जवळील कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र तसेच कृषी विभाग यांच्याशी शेतकरी बंधु-भगिनींनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन किल्ला-रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply