Breaking News

लम्पीमुळे दुग्ध व्यावसायिकांना फटका

गैरसमजामुळे ग्राहक संख्या घटली

पाली : प्रतिनिधी
लम्पी रोेगामुळे शेतकरी व पशुपालक हवालदिल झाले आहेत. या आजाराबद्दल अनेक नागरिकांमध्ये गैरसमज पसरत असून काही लोकांनी दूध घेणे व पिणे बंद केले आहे. याचा फटका दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे.
लम्पीचा फैलाव दुधातून होत नाही. याबद्दल पशुसंवर्धन विभागाने माहिती दिली तरीही लोकांमध्ये चिंता व भय आहे. परिणामी धोका नको व खबरदारी म्हणून काही लोकांनी दूध सेवन करणे बंद केले आहे. कोरोनामुळे गावखेड्यातील दुग्ध व्यवसाईकांचे कंबरडे मोडले होते. आता कुठे हा व्यवसाय रूळावर येत होता, मात्र लम्पीमुळे पुन्हा या व्यवसायावर संकट आले आहे.
जिल्ह्यात लम्पीबाधित काही जनावरे आढळली आहेत. त्यांचे लसीकरण करून विलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाच बाधित क्षेत्र आहेत. लम्पी रोग देशी गायींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. संकरित गायींना होत नाही. त्यामुळे दुधावर परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात एकूण दोन लाख 39 जनावरे आहे. त्यातील गोवंश संख्या दीड लाख व उर्वरित 89 हजार महिष (म्हैस) वर्ग जनावरे आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली.
लम्पी रोगासंदर्भात प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी अधिनियमाखालील अधिकारांतर्गत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शासकीय यंत्रणांना दिले आहेत. लम्पीसदृश, बाधित जनावरे आढळल्यास योग्य ते उपचार करणे, विलगीकरण करणे, नमुने गोळा करणे व तत्काळ प्रयोगशाळेत पाठविणे, आजारी जनावरांचा दैनंदिन अहवाल तयार करणे, उपचार करणे, नमुने होकारार्थी आल्यास पाच किलोमीटरच्या अंतरातील क्षेत्रात लसीकरण करणे आदी उपयोजना केल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात 15 तालुक्यांतील संघटित, असंघटित नोंदणीकृत व अनोंदणीकृत, किरकोळ विक्री करणारे असे मिळून साधारणत: 20 ते 25 हजार दूध व्यावसायिक आहेत. लम्पीच्या गैरसमजुतीमुळे ग्राहकांनी दूध बंद केल्याचा फटका साधारण 10 ते 15 टक्के व्यावसायिकांना बसला असण्याची शक्यता आहे.

बिनधास्त प्या दूध!
जनावरांमधील लम्पी रोगामुळे अफवा पसरल्या आहेत, मात्र लम्पीबाधित जनावराचेही दूध पिता येऊ शकते, कारण आपण दूध 100 डिग्री सेल्सिअसला उकळून घेतो. कोणताही विषाणू या तापमानाला जिवंत राहू शकत नाही. लम्पीमुळे दुधाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही. म्हणून बिनधास्त दूध प्या, असे सुधागड तालुका पशुधन विकास अधिकारी सविता राठोड यांनी म्हटले आहे.

लम्पी रोगाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकांना वाटते की दुधातूनसुद्धा हा आजार पसरतो. त्यामुळे भीतीपोटी अनेक ग्राहकांनी दुधाचे उकडे बंद केले आहेत. त्याचा धंद्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या संदर्भात पशुसंवर्धन विभाग लोकांमध्ये जनजागृती करीत आहे, पण अधिक लोकांपर्यंत हे पोहचले पाहिजे.
– राम तुपे, दूध व्यावसायिक, कोंडगाव, सुधागड

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply