नवी मुंबई : बातमीदार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे केवळ तुमचे वडील नव्हते, तर समस्त शिवसैनिकांसाठी वडिलांसमान आहेत. त्यामुळे ते एका कुटुंबाची मालकी नाहीत, असे सांगत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते शुक्रवारी (23) ऐरोलीत आयोजित हिंदु गर्वगर्जना संपर्क यात्रेच्या मेळाव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आमदार, खासदार, शिवसैनिकांना भेटले नाहीत. प्रश्न सोडविले नाहीत. यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली.त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढावा व मग जनतेत जावे, असे आव्हान ना. दादा भुसे यांनी दिले. त्यांना खोके, ओके, गद्दार, खंजीर या पलीकडे बोलता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
या वेळी मंत्री दादा भुसे यांनी नवीन सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. शेतकर्यांना दुप्पट नुकसानभरपाई दिली जात आहे. नवी मुंबईत मोडकळीस आलेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अडीच वर्षांत घरातून बाहेर पडले नाहीत. एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकांमध्ये मिसळणारे मुख्यमंत्री आहेत.
गद्दार म्हणणार्यांकडे दुर्लक्ष करा. तेच गद्दार आहे. अडीच वर्षांत कधीच शिवसैनिकांना भेटले नाहीत, असा आरोप शिवसाना उपनेते विजय नाहटा यांनी केले. उपनेत्या शितल म्हात्रे, संध्या वडावकर यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टीका केली.
मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना मदत
मुंबईतील शिवशंभू गोविंदा पथकामधील संदेश दळवी यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या वतीने एक लाख रुपयांची मदत केली. मदतीचा हा धनादेश मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संदेश दळवी यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत, म्हणूनच त्यांनी करून दाखवले -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत
पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत. राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी …