Breaking News

5जी सेवेची प्रतीक्षा संपली! पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला शुभारंभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली 5जी इंटरनेट सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्वीट करून ही माहिती दिली.
इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील प्रगती मैदानावर केले जाणार आहे. त्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरक्षेत्र क्षेत्रातील 5जी क्रांतीचा शुभारंभ होईल. आशियातील सर्वांत मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच असल्याचा दावा करून इंडिया मोबाइल काँग्रेस हे दूरसंचार विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे. हा कार्यक्रम 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
केंद्रीय दळणवळण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, सरकारने अल्प कालावधीत देशात 5जी दूरसंचार सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती गेल्या आठवड्यात दिली होती. पहिल्या टप्प्यात 5जी दूरसंचार सेवा देशभरातील सुमारे 13 शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.
5जी वापरकर्त्यांना 4जीपेक्षा 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे. शिवाय 5जी सेवेद्वारे निर्माण होणार्‍या रेडिएशनची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे, असेही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply