Breaking News

रयतेचा आधारवड

महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य आपल्या खांद्यावर घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली व दिनांक 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

कर्मवीर अण्णांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे खुली केली. वसतिगृहांची स्थापना करून अठरापगड जातीच्या मुलांना सहजीवनाचा मंत्र दिला. ‘कमवा आणि शिका’ ही योजना राबवून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले. गाव तिथे शाळा स्थापन करून शिक्षणाची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेली व शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ ठरले. रयतेच्या शिक्षणाचा ध्यास घेणार्‍या या महामानवाच्या पश्चातही त्यांनी निर्माण केलेल्या ज्ञानगंगेची ही ज्योत असंख्य रयतपुत्रांनी तेवत ठेवली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यप्रणाली आणि विचारप्रवाहातून तावून सुलाखून निघालेले रायगड जिल्ह्यातील आदर्शवत व्यक्तिमत्त्व म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर होत!

पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर या लहानशा गावामध्ये अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील दोघेही दररोज शेतांवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत, परंतु गरीब कुटुंबात जन्म घेऊनही मा. रामशेठ ठाकूर साहेबांनी जिद्दीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उच्च शिक्षणासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘कमवा आणि शिका’ योजनेमध्ये सहभागी होऊन प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. कर्मवीर अण्णांच्या स्वावलंबनाच्या या अभिनव प्रयोगशाळेमध्ये श्रमाची प्रतिष्ठा शिकून त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर खर्‍या अर्थाने त्यांच्या आर्थिक प्रगतीची गरूडभरारी सुरू झाली. शिक्षण, श्रम व संस्कार यांच्या त्रिवेणी संगमाने मा. रामशेठ ठाकूर साहेबांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल झाला. सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केल्यानंतर उद्योगक्षेत्रात प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तो समर्पक ठरला. कारण साक्षात लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली व पनवेल तालुक्यातील एका यशस्वी उद्योजकाची राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल अत्यंत वेगाने सुरू झाली. कर्मवीरांच्या मुशीत तयार झाल्याने त्यांच्या विचारांचा पगडा मा. रामशेठ ठाकूरसाहेबांच्या मनावर कायमचा कोरलेला आहे. त्यामुळेच आपल्या कमाईतील 25 टक्के वाटा हा समाजाचा आहे असा विचार करणारे ते एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. महाभारतातील दानशूर कर्णाप्रमाणेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राला भरभरून आर्थिक मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात ते सर्वोतोपरिचित आहेत.

रयत शिक्षण संस्थेचे कार्य पुढे नेण्याचे काम संस्थेचे हितचिंतक, कार्यकर्ते, शिक्षक व माजी विद्यार्थीच करतील, असा आत्मविश्वास कर्मवीर अण्णांना होता. संस्थेच्या शताब्दी महोत्सवाची वाटचाल पाहिल्यानंतर हाच प्रत्यय येतो. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, कै. पतंगराव कदमसाहेब, मा. एन. डी. पाटीलसाहेब, कै. रावसाहेब शिंदेसाहेब व डॉ. अनिल पाटीलसाहेब यांच्या खांद्याला खांदा लावून मा. रामशेठ ठाकूरसाहेबांनी काम केले आहे व सातत्याने करीत आहेत. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात त्यांची आर्थिक मदत असते. दरवर्षी संस्थेला कोट्यवधी रुपयांची देणगी त्यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून दिली जाते ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्यास संगणक शिक्षण देण्याची योजना मा. शरदचंद्रजी पवारसाहेबांनी जाहीर केल्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या मा. रामशेठ ठाकूरसाहेबांनी क्षणाचाही विलंब न करता एक कोटी रुपयांची देणगी या प्रकल्पास जाहीर केली. त्यांची कृती कर्मवीर निष्ठेचे प्रतीक आहे. कर्मवीर अण्णांनी संस्थावाढीसाठी प्रत्येक घरोघरी जाऊन पैशांच्या किंवा धान्याच्या रूपात देणगी जमा केली, परंतु संस्थेचा एक विद्यार्थी नि:स्वार्थपणे कोट्यवधी रुपयांची देणगी देत आहे हे पाहून कर्मवीर अण्णांना मा. रामशेठ ठाकूरसाहेबांचा निश्चितच अभिमान वाटला असता.

 छत्रपती शिवाजी कॉलेजने आपल्याला शिक्षणरूपी वाघिणीचे दूध दिले. त्या महाविद्यालयाची चार कोटी रुपयांची एक आदर्श प्रशासकीय इमारत बांधून देण्याची घोषणा मा. रामशेठ ठाकूरसाहेबांनी केली व बांधकामाची सुरुवात वेगाने सुरू केली. संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाच्या या प्रशासकीय इमारतीचे प्रत्यार्पण काही दिवसांत होणार आहे. तो क्षण ऐतिहासिक असेल! कर्मवीर अण्णांच्या परीस स्पर्शाचा व दूरदृष्टीचा हा विजय आहे असे मी मानतो. देतो तो देव! राखतो तो राक्षस! या उक्तीनुसार बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक मदत देणार्‍या मा. रामशेठ ठाकूरसाहेबांच्या दातृत्वास सलाम!

माणसाचे मोठेपण हे त्याच्या जन्मावर अवलंबून नसते, तर ते त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. मा. रामशेठ ठाकूरसाहेबांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने व रयत शिक्षण संस्थेवरील निष्ठेने ते सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यामुळेच संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर व एक्झिक्युटिव्ह कमिटीवर त्यांची दर तीन वर्षांनी निवड करून त्यांना सन्मानित केले जाते. आपल्या जीवनात मिळालेल्या अनेक पुरस्कारांपेक्षा संस्थेचा ‘रयत माऊली पुरस्कार’ व ‘इस्माईल साहेब मुल्ला पुरस्कार’ मला जास्त मोलाचा वाटतो, असे जाहीरपणे सांगणारे ते एक निष्ठावान माजी विद्यार्थी व सच्चे हितचिंतक आहेत याचा सर्व रयतसेवकांना अभिमान वाटतो.

रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवात पदार्पण करीत असताना विविध शाखांच्या जुन्या झालेल्या इमारती आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने अद्ययावत करणे संस्थेपुढे मोठे आव्हान असून, ते स्वीकारून रायगड जिल्ह्यातील विविध शाखांच्या इमारती नवीन बांधून देण्याचा संकल्प मा. रामशेठ ठाकूरसाहेबांनी केला आहे. गव्हाण, कामोठे, रिटघर, वावंजे व उलवा या शाखांच्या नवीन इमारती बांधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच संस्थेच्या विविध हायस्कूल व महाविद्यालयांना विविध कामांसाठी त्यांनी भरघोस देणगी दिली आहे. पनवेल महाविद्यालयाच्या गौरवशाली सुवर्ण महोत्सवी वाटचालीत त्यांचे मार्गदर्शन व खंबीर पाठिंबा प्रत्येक यशस्वी मोहिमेमध्ये निर्णायक आहे.

आपल्या वडिलांच्या नावाने स्वत:ची शिक्षण संस्था स्थापन केली असतानासुद्धा रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था असून, माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी संस्थेच्या विकासात माझे योगदान देत राहीन, असा दृढनिश्चय त्यांनी केला. आपल्या कृतीने त्यांनी तो सिद्ध केला आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीनुसार मा. रामशेठ ठाकूरसाहेब खर्‍या अर्थाने रयत शिक्षण संस्थेचे आधारवड झाले आहेत. त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रयत परिवारातर्फे त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, महात्मा फुले ए. एस. सी. कॉलेज, पनवेल

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply