Breaking News

टंचाईचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज

अलिबाग ः प्रतिनिधी

दुष्काळाचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील गाव तलावांतील गाळ काढणे, विंधन विहिरींची कामेही त्वरित हाती घेऊन पूर्णत्वास न्यावीत, तसेच जलयुक्त शिवाराची कामे मेअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दररोज राज्यातील विविध जिल्ह्यांच्या सरपंचांशी संवाद सेतू बैठकीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेत जिल्हा प्रशासनालाही तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देत आहेत. त्या अनुषंगाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा कृषी अधिकारी पी. बी. शेळके आदी उपस्थित होते.

 बैठकीत त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची माहिती घेतली. 2016-17मध्ये 37 गावे निवडण्यात येऊन प्रस्तावित 966 कामे पूर्ण झाली आहेत. सदर कामांमुळे निर्माण झालेला पाणीसाठा 3393 टीसीएम इतका असून निर्माण झालेले सिंचन क्षेत्र 265 हेक्टर इतके आहे. 2017-18साठी 110 गावे निवडण्यात आली असून 1468 कामे पूर्ण झाली आहेत. सदर कामांमुळे निर्माण झालेला पाणीसाठा 4540 टीसीएम इतका असून निर्माण झालेले सिंचन क्षेत्र 474 हेक्टर इतके आहे. 2018-19साठी एकूण 69 गावांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तावित 1017 कामांपैकी 199 कामे पूर्ण झाली असून 512 कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित सर्व कामे मेअखेर पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे जिल्ह्याच्या तलाव क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे विशेषत: कृषी विभाग, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांनी तातडीने जलयुक्त शिवारच्या अनुषंगाने मधील कामे हातावेगळी करून एक उत्तम उदाहरण निर्माण केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. जलसंधारण उपचारांमुळे भूगर्भातील जलपातळी वाढतानाच जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे साहजिक पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन उत्पादकता वाढते. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या जलसंधारण उपचारानंतर भात आणि नागली पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढली होती.

रायगड जिल्ह्यातील शेतकरीही आता दुबार पीक पद्धतीकडे वळत असून भाजीपाला लागवडीकडे शेतकर्‍यांचा अधिक कल दिसून येत आहे. याशिवाय भाजीपाल्याला स्थानिक बाजारपेठही उपलब्ध असते ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकर्‍यांना अधिक प्रोत्साहन आणि पाण्याचे उत्तम नियोजन करून देण्याची आवश्यकताही त्यांनी नमूद केली. 15 तालुक्यांत गाव तलावातील गाळ काढण्याची कामेही वेगाने हाती घेऊन संपविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी तातडीने अंमलबजावणी करून अहवाल द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply