Breaking News

निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी काय म्हणाला?

हैदराबाद : वृत्तसंस्था

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्रातील जेतेपदाचा मान रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पटकावला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या चेन्नईला यंदा मुंबईविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही आणि अंतिम फेरीतही त्यांनी अपयशाचाच पाढा गिरवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाबरोबरच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला सुरुवात झाली. सामना संपल्यानंतर धोनीला पुढील आयपीएलमध्ये खेळणार का, हा प्रश्न विचारला गेला. धोनीनं तितक्याच शिताफीनं त्याचं उत्तर दिलं.

यंदाची आयपीएल ही धोनीची अखेरची असल्याचा तर्क लावला जात आहे. त्यामुळेच सामन्यानंतर त्याला पुढील आयपीएलमध्ये खेळणार का, असे विचारण्यात आले. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही फार सामने सध्या खेळत नाही. कसोटीतून निवृत्ती स्वीकारणारा धोनी वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडमध्ये होणार्‍या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती घेईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आयपीएलच्या बाबतीत धोनीच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सामन्यानंतर तो म्हणाला, ‘एक संघ म्हणून आमची कामगिरी समाधानकारक झाली, परंतु काही गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. मधल्या फळीनं निराश केलं, परंतु तरीही आम्ही संघाची घोडदौड कशीबशी कायम राखली. आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करायला हवी होती.’

पुढील आयपीएलच्या प्रश्नावर धोनी म्हणाला, ‘पुढील वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. पुढील वर्षी खेळणार की नाही यावर आता सांगणे ही घाई ठरेल. वर्ल्ड कप स्पर्धा हे या वेळी माझ्यासाठी प्राधान्य आहे. त्यानंतर आम्ही चेन्नईविषयी बोलू. गोलंदाजांची कामगिरी उत्तम झाली आहे, परंतु फलंदाजांविषयी चर्चा करण्याची गरज आहे. पुढील वर्षी तुम्हाला भेटण्याची आशा करतो.’

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply