राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांना ग्लॅमर लाभलेले आहेत. कदाचित त्यामुळेच इतर क्षेत्र निवडण्यापेक्षा अधिक पसंती राजकारण, क्रिकेट आणि सिनेमाला दिली जाते. राजकारणात वलंयाकित जीवन जगता येते. क्रिकेटमध्येही पैसा आहे आणि जाहिरातींमध्येही हिर्यासारखे चमकत राहण्याची संधी लाभते. सिनेमात तर काय कॅमेर्याच्या सान्निध्यातच जीवन लखलखत असते… हे जितकं खरं तितकंच हेसुद्धा ठामपणे सांगावं लागेल की, भाजप नेते अरुणशेठ जगन्नाथ भगत हे राजकारणात अपघातानेच आले आणि टिकलेही…, पण रग्गड पैसा कमविण्यासाठी त्यांचे हात कधीच सरसावले नाहीत. हे अगदी अभिमानाने सांगावे लागेल. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत हे कुटूंबवत्सल असलेले व्यक्तिमत्त्व अतिशय तरलमय जीवन जगत आहेत. संगीत, सिनेमा, नाटकाबद्दल अभिरूची तर त्यांना आहेच, परंतु त्यांना वाचनाचा प्रचंड व्यासंग आहे. चांगल्या लेखकांची पुस्तके हातात घेतली की, एका दमाने ती वाचून काढण्याची त्यांची सवय वेगळीच आहे. पुस्तके माणसाला समृद्ध करतात, विचारांची दिशा देतात, चारचौघात ठामपणे विचार मांडण्याची स्फूर्ती देतात. वाचकाचे जीवन कलेकलेने विकसित करतात. हे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सतत जाणवते. ते कमी बोलतात, पण जे बोलतात ते 24 कॅरेट सोन्यासारखे सच्चे असते. त्यांचा हा गुण वाखाणण्यासारखा आहे. खरे राजकारणी जे असतात त्यांना काळाची पावले आधीच दिसत असल्याने खोटे बोलण्याचा व्यासंग कधीच शिवत नाही. त्याच पठडीतील अरुणशेठ आहेत. त्यांचा हा गुण त्यांच्याभोवती मानवी मनाचे जाळे विणून एक मोठा गोफही आपसुकच तयार करतो. आज स्थानिक राजकारणात सर्वच राजकीय पक्षांच्या बाबतीत विचार केला, तर अरुणशेठ भगत यांच्या एवढा लोकसंग्रह दुसर्या कुठल्याच नेत्याकडे नाही. रिकाम्या हाताच्या माणसांकडे लोहचुंबक कधीच आकर्षित होत नाही, परंतु अरुणशेठ भगत त्या तत्त्वाला अपवाद ठरले आहेत. हाताची रिक्त ओंजळ पाहूनही हजारो कार्यकर्ते त्यांच्यावर सागराच्या लाटांसारखे प्रेमाची पखरण करीत असतात आणि अरुणशेठ एखाद्या किनार्यासारखे स्थितप्रज्ञाप्रमाणे त्यांचे प्रेम अनुभवत रिचवत असतात. शेलघर या ग्रामीण आणि त्या काळात मागासलेल्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. शेलघर हे राजकीय पटलावरील गाव. दिवंगत नेते जनार्दन आत्माराम भगत यांचे ते जन्मगाव. अरुणशेठ भगत यांचे केवळ आडनाव भगत असले तरी त्यांचे आणि जनार्दन भगत यांचे रक्ताचे असे नाते नाही, पण तरीही भगतसाहेबांवर जीवापाड प्रेम करणारे व त्यांची साथसोबत करण्यात अरुणशेठ भगत यांचे वडील जगन्नाथ भगत यांनी हयात घालविली. त्यांनी भगतसाहेबांना अगदी जवळून अनुभवले होते. त्यांची शिकवण जगन्नाथ भगत यांनी त्यांच्या सर्व मुलांमध्ये रूजवल्याने अरुणशेठ भगत यांना राजकारणात यश मिळत गेले. त्या शिकवणीमुळे ते गेली 40 वर्षे राजकारणात सक्रिय राहूनही पैसे कमविण्याच्या भानगडीत पडले नाहीत की, राजकारणाला लाभलेल्या ग्लॅमरचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. राजकारणात राहून निरागस वृत्तीने समाजासाठी झिजत जाणे सोपं नाही, परंतु अरुणशेठ भगत यांनी समाजहिताला नेहमी प्राधान्य दिले. पैशासाठी वाट्टेल त्या स्तराला जाणारे अरुणशेठ भगत कधीच कुणी पाहिले नाहीत किंवा सतत कॅमेर्याच्या क्लिकमध्ये अडकून स्वतःकडे प्रसारमाध्यमांचा ओघ त्यांनी ठेवला नाही. याचे कारण जनार्दन भगतसाहेबांची शिकवण आणि त्यांनी केलेले संस्कार आहेत. भगतसाहेबांच्या निधनानंतर अरुणशेठ भगत यांचा राजकीय उदय झाला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना सक्रिय केले. तेव्हापासून ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत सावलीसारखे राहत आले आहेत. हीच त्यांची राजकीय वाटचालीतील पुण्याई त्यांच्या पदरात पडत आहे. मुलांची लग्न असो की, कुटुंबात काही सुख-दुःख… ‘आधी लगीन कोंढाण्या’चे या शूरवीर तानाजींच्या तत्त्वाप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शब्दासाठी त्यांची ओंजळ कायमची प्रतीक्षा करीत असते. त्यांनी शब्द टाकावा आणि अरुणशेठ भगत यांनी तो निष्ठेने झेलावा. अगदी महाराज गडावर जाईपर्यंत प्राणप्रणाने खिंड लढणार्या बाजीप्रभूंचा बाणाच भगत यांनी अंगीकारला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर देतील ती कामगिरी पार पाडण्यात जीवन खर्ची पडले तर ते सार्थकच ठरेल इतकी पराकोटीची निष्ठा त्यांच्यापायी अर्पण करणारे अरुणशेठ भगत हे सगळ्या लोभांपासून, हव्यासापासून दूर राहिले आहेत. कदाचित् त्यांच्या या सदैव कार्यरत राहण्याच्या सवयीमुळे त्यांचे वय नेमके किती हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर तेच देत असले तरी मन मानायला तयार नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर नावाचा देवमाणूस त्यांना लाभला. त्याचप्रमाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे भरभक्कम नेतृत्व व साथ. त्यांच्यावर कार्यकर्त्यांचे जे प्रेम आहेच, तेच अरुणशेठ भगत यांच्या वाट्यालाही आले आहे. काहींना ते टिकवता येत नाही, काहींनी ते पचत नाही. इतकी वर्ष राजकारणात ठाम राहूनही ते जराही विचलित झाले नाहीत. यातच त्यांच्या यशाचे रहस्य दडले आहे. कदाचित या गुणांमुळे ते पैशाच्या मागे धावले नाहीत की ग्लॅमरची छटा अंगावर पडू दिली नाही. जनशक्ती हीच त्यांची श्रीमंती आहे, तर आयुष्याच्या धाग्याने जोडलेले कार्यकर्ते त्यांची पुंजी आहे. हे केवढे मोठे काम त्यांनी करून ठेवले याचा हिशेब त्यांनाच ठावूक नसावा. अरुणशेठ यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. जमिनीवरील माणसांच्या घोळक्यात राहून त्यांनी शतायुषी व्हावे, त्यांना उत्तम आयुरोराग्य लाभावे आणि राजकारणातील अनेकांना कुटूंबाप्रमाणे जोडून मांडलेला या आप्तस्वकियांच्या संसाराची साखरपेरणी करीत तो असाच फुलत राहवा याच त्यांना मनापासून शुद्ध शुभेच्छा!
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …