Breaking News

आगरी-कोळी समाजात लग्नसोहळेही होताहेत स्मार्ट

उरण : जीवन केणी  : उ0रण तालुका विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या परिसरात साजर्‍या होणार्‍या यात्रा उत्सव सोहळ्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. आगरी कोळी समाजातील लग्न सोहळा म्हणजे पर्वणी समजली जात होती, परंतु आज या समाजातील लग्न सोहळ्याची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलून गेली असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

आगरी-कोळी समाजात लग्न सोहळा म्हटले म्हणजे एक पर्वणीच, घराघरातून दिवसभर असणारी नातेवाईकांबरोबर गावकर्‍यांची धावपळ, एकमेकाला सह्कार्य करण्याची भावना, हळदीच्या दिवशी सकाळी असणारा जवळा पोळ्यांचा नास्ता, रात्री होणारा कुलदैवतांचा गोधळ आणि रात्रभर सुटणारा वडे फेण्या तळण्याचा खमंग वास, धवलारनीने गायलेले धवलागीत, घोड्यावर स्वर होवून टिमकीच्या, बाजाच्या आणि ताशाच्या तालावर नाचत निघालेली वरात हे सारे काही पाहण्याची एक वेगळी परंपरा न्यारी होती, परंतु आता स्मार्टसिटीकडे पदार्पण करीत असताना लग्नसोहळेही स्मार्ट होऊ लागले आहेत.

पारंपरिक वाजणारा टिमकीचा बाजाची जागा कालांतराने कोंबडीबाजा 80 च्या दशकात बेंन्जो त्यानंतर आलेला कॅशियोबँड, ब्रासबँड आणि आता सरसपणे मंडपात वाजणारा डीजे. कधीकाळी जुन्या साड्या किंवा गावातून जमा करून आपल्याला धोतराचे छत बांधण्याची परंपरा यासाठी ग्रामस्थाने असणारे सहकार्य आता दिसून येत नाही. तर थेट मंडपडेकोरेटरला ऑर्डर देवून उभारलेला अलिशान मंडपाचा शामियाना पहावयास मिळतो. शेणामातीने सारविलेल्या जमीन, मातीवर टाकण्यात आलेल्या पालघड्यावर जेवणावेळीची पंगत. चवळी, कोबीची खमंग भाजी, वडे-फेण्या आणि ग्लासभर मिळणारा पाती, सुंठ किंवा आले टाकलेला कोरा चहा आणि त्याचा मनसोक्त आस्वाद घेणारे गावकरी हे चित्र आता पूर्णपणे बदलले आहे.

मांडव स्थापनेच्या वेळी करवल्यांची धावपळ आजी, आत्या, काकी, मामींच्या सूचना आणि त्याच्या सूचनांचा आदर करणार्‍या सुना, मुलींची मानसिकता आता बदलत चालली आहे. धवलारीन, ब्राह्मण, नवरा मुलगा अथवा नवरी मुलगी मांडव स्थापनेला बसली, तरी करवल्यांच्या सुरू असणारा मेकअप पूर्ण झालेला नसतोच. अशा परिस्थितीत बँन्जो अथवा कॅशिओच्या तालावर ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यासाठी निघालेली मांडव स्थापनेच्या दिवशीच्या रात्रीची वरात आज मंदिरात गेली काय आणि आली काय. याला वेळ लागत नाही.

पूर्वी टिमकीच्या बाजावर निघालेली हीच वरात मंदिरातून मंडपापर्यंत परत येण्यास तासाभराचा अवधी लागत होता. कारण त्या वेळी टिमकीच्या बाजावर बेभान होवून नाचणार्‍या करवल्या होत्या, तर आता वरात अंगणातून गेली तरी मेकअप-साड्या आणि ड्रेस घालण्यात वेळ जात असल्याने अशा वरातीमधून नाचणार्‍या करवल्याच हरविल्या असल्याचे दृश्य सर्वत्र दिसू लागले आहेत. लग्नाच्या दिवशी मुलीच्या मंडपात घोड्यावरून जाणारा नवरदेव आता कार मधून जावू लागला आहे. लग्न लागल्यानंतर हमखास वाटण्यात येणार्‍या कोर्‍या चहाची जागा सोडा, लेमन सरबत, दूध, कोल्ड्रिंग आणि आता आईस्क्रीमने घेतली आहे. नवरी मुलीच्या घराच्या मंडपात होणारा लग्नसोहळा आता हॉलमध्ये किंवा सिनेमासारखा भवदिव्य सेट उभारून होऊ लागला आहे. अंगणात बसणार्‍या जेवणावेळी आता टेबल-खुर्च्यावर बसू लागल्या आणि आता तर बुफे सिस्टमने उभ्यानेच जेवण खाण्यावर आल्या आहेत.

स्मार्टसिटीकडे पदार्पण करीत असताना लग्नसोहळेही स्मार्ट होऊ लागले, परंतु अशा स्मार्ट लग्नसोहळ्यात आपण सारे जण जिव्हाळा, आपुलकी प्रेम ही एकात्मता व पारंपरिक रूढी हे सारे हरवून बसलो आहोत, परंतु कधी तरी कोठेतरी टिमकीच्या बाजाचे सूर कानी पडतात तेव्हा जुन्या आठवणी जाग्या होतात. ‘या गो दांड्यावरून नवरा कुणाचा येतंय’ म्हणत नकळत पाय थिरकतात ते. ‘ उठगो उठ रोजी नाच बघा येतंय बाजा कुणाचा तया वाजतंय बाजा बि वाजतंय बेसावचा दिसतंय बंदरावर धन्या मना नाच येतंय’ हे स्वर टिमकीच्या बाजाने वाजविल्यावर न कळत जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आगरी-कोळी समाज बांधव जरी स्मार्ट लग्न सोहळ्याकडे वळले असले, तरी देशातील अन्य समाजातील करोडपतींच्या घरी लग्न असले, तरी त्यांच्या पारंपरिक चालीरीती, पारंपरिक वाद्य हीच लग्नसोहळ्याची खरी शान म्हणून त्याचा हमखास वापर करतात. आजसुद्धा हे चित्र दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्यांना पाहायला मिळते, परंतु पैशाच्या हव्यासापोटी आगरी-कोळी मात्र पारंपरिक चालीरीतीपासून दूरवर फेकला गेला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply