नागरिक हैराण; महावितरणचे दुर्लक्ष
उरण ः वार्ताहर
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीत मागील तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असून त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज महावितरण कंपनीने मीटरचे रीडिंग न घेता सरासरी वीज बिले आकारण्यात आली. सदरची वीज बिले ही नेहमी येणार्या बिलांपेक्षा जास्त प्रमाणात असल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.
त्यातच कोरोनामुळे रोजगाराअभावी पैसा न मिळाल्याने अव्वाच्या सव्वा बिले कशी भरणार याची चिंता ग्राहकांना सतावत आहे. त्यातच विजेचा लपंडाव ही नित्याचीच बाब झाली आहे. वेळी अवेळी वीज जात असल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे बंद होणे, त्यात बिघाड होणे व बिघाड विद्युत उपकरणांना
दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरूच असल्याने घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे जळाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा वीज महावितरण कंपनीला कळविले आहे, परंतु नागरिकांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विजेचे पोल जीर्ण झाल्याने ते बदलण्यासाठी अनेक वेळा वीज महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना सांगितले आहे. या समस्येकडे महावितरण कंपनी अधिकार्यांनी लक्ष द्यावे व समस्या दूर कराव्यात, असे ग्रुप ग्रामपंचायत केगावचे माजी सरपंच राजेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे.