Breaking News

समाजसुधारक संत गाडगे महाराज

गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रात झाला होता. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जाणोरकर असे होते.

हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधीसुधी आणि गरीब होती. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रूची होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांत भटकत असत. गाडगे महाराजांचा विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये मोठा सहभाग आहे. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. त्यांचे कीर्तन लोक प्रबोधनाचा एक भाग असायचे. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. गाडगे महाराजांची गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी ते कार्यशील होते. दीनदुबळे, अनाथ, अपंगांची ते नेहमीच सेवा करीत असत. देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्रतंत्र, चमत्कार यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच देव आहे, असे त्यांचे मत होते. याचाच शोध ते घेत होते. समाजकार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले. दीनदुबळे, अपंग, अनाथ हेच त्यांच्यासाठी देव होते. त्यांच्या सेवेमध्येच ते जास्त काळ रमायचे. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. आपल्या कीर्तनातून त्यांनी देव दगडात नसून तो माणसात आहे, हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरू मानत असत. आपल्या कीर्तनात ते वर्‍हाडी भाषेचा प्रयोग करीत असत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही,’ असे ते म्हणायचे. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या. बाबांच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज आणि ज्योतिबांची शिकवण दिसते. 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

गाडगे महाराजांचे उपदेशात्मक सुविचार

  1. चोरी करू नका. 2. सावकाराकडून कर्ज घेऊ नका. 3. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. 4. देवाधर्माच्या नावाखाली प्राणीहत्या करू नका. 5. जातीभेद, अस्पृश्यता पाळू नका. 6. श्रीमंत-गरीब असा भेद करू नका.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply