Breaking News

सुधागडातील प्राचीन लेण्यांकडे प्रशासनासह ‘पुरातत्त्व’चे दुर्लक्ष

उपद्रवींकडून रंगरंगोटीतून विद्रुपीकरण, ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे  ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशविदेशातील अभ्यासक दौरे देखील करत असतात. जगभरातील पर्यटकांना भावणार्‍या लेण्या स्तूप जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्राचीन लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे फारसे लक्ष नसल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणार्‍या या वास्तू नामशेष होण्याची भिती त्यामुळे त्यांचे जतन व संगोपन होण्याची आवश्यकता आहे. उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण करण्यात येत असल्याने लेणी प्रेमी व पर्यटकात नाराजी दिसून येत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन बौद्ध कालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. येथील स्तुप, विहार, चैत्यगृह, शिलालेख स्मारक यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यावर अनेक उपद्रवी लोकांनी चक्क ऑईल पेन्टने नावे लिहीली आहेत. त्यामुळे ऐतिहासिक व इतिहासाची भरभक्कम साक्ष देणार्‍या या वास्तू नामशेष होण्याची भिती आहे. ही लेणी समुद्र किनार्‍यावरुन चौल-धरमतर-नागोठणे खाडीमार्गे देशावर जाणारी व्यापारी केंद्रे होती असे म्हटले जाते. वाघजाई, घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्गही या लेण्यांजवळून जातो. यामुळे ही लेणी चौल बंदराच्या सानिध्याने खोदली गेली आहेत. कोकणातून घाटमार्गे देशावर जात-येतांना विश्रांतीचे स्थान म्हणुन हया लेण्यांचा उपयोग केला गेला. त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंच्या भदन्त, आचार्य, परित्राजक यांच्या निवार्यासाठी सुद्धा या लेण्यांचा उपयोग इ.स. 5 व्या शतकापर्यंत करण्यात आला आहे. या लेण्या अतिशय प्राचिन असून एैतिहासिक आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याने वेळीच या लेण्यांची डागडुजी व देखभाल करणे गरजेचे आहे. येथे येणार्‍या पर्यटकांनी लेण्यांवर नावे टाकुन येथील सौदर्याला गालबोट न लावता, येथिल परिसर साफ व संरक्षित कसा राहिल याची दक्षता घेतली पाहीजे, असे आवाहन शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्रने केले आहे.

ठाणाळे लेणीची वैशिष्ट्ये

ठाणाळे लेणी समुहात चैत्यगृह, स्मारक,-स्तुपसमुह, सभागृह व उर्वरित 21 विहार लेणी आहे. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोरच्या भागात दालन व चार पाच भिक्षुंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. 5 पायर्या असलेल्या एका विहारात वाकाटककालिन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात. प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे. पाण्याचे हौद, टाके, ब्राम्ही शिलालेख भित्तीचित्र आहेत. या सर्वांची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. बरेच अवशेष भग्नावस्थेत आहेत. अनेक उपद्रवी लोकांनी येथील स्तुप, चैत्यगृह, स्मारक यावर चुन्याने व ऑईल पेन्टने आपली नावे कोरली आहेत. त्यामुळे या एैतिहासिक वास्तुचे सौंदर्य लुप्त झाले आहे. ठाणाळे लेण्यांसारखा ऐंतिहासिक व पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी अशी मागणी पर्यटकप्रेमी व लेणीप्रेमी यांनी केली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply